पुणे – नुकतंच पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेशकुमार यांची नियुक्ती झाली आहे. ते राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) मुंबई येथे अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची आता पुण्यात बदली झाली आहे. तर पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने विनयकुमार चौबे यांची नियुक्ती झाली आहे.
चौबे हे राज्याच्या लाचलुचपत विभागाच्या अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राज्याच्या कायदा सुव्यवस्था विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली झाली आहे. गुप्ता यांनी शहरातील गुंड आणि गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का आणि तडीपारीची कारवाई केली होती. त्यामुळे त्यांचा शहरात दबदबा होता. त्यांनी शंभरहून अधिक मोक्काच्या कारवाया केल्या आहेत.
दरम्यान, अधिकाऱ्यांच्या या बदल्या झाल्यानंतर लगेचच पुणे शहरात गोळीबाराची घटना घडल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील वारजे येथील रामनगरमधील वेताळबाबा चौकात गोळीबार करण्यात आला. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात मोठं दहशतीचं वातावरण पसरलं असून, सामान्य नागरिकांमध्ये मोठी दहशद निर्माण झाली आहे. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या आरोपींनी पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांना आपल्या अनोख्या स्टाईलने सलामी दिल्याची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक इंगवले असं गोळीबार केलेल्या आरोपीचं नाव आहे. कार्तिकने दारू पिऊन नशेत असताना हा गोळीबार केला आहे. कार्तिक इंगवलेचा मित्र वेताळ बाबा चौकामधून चालला होता. त्यावेळी कार्तिकने त्या मित्राकडून ५०० रूपये मागितले होते. त्याने पैसे नाही दिले म्हणून कार्तिक इंगवलेने त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या घटनेमुळे सामान्य पुणेकरांच्या मनात दहशद निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्य पोलीस दलातील तब्बल ३० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.