कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताला लागून असलेल्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील न्यूटाऊन भागात शुक्रवारी सकाळी एका तरुणीचा अर्धनग्न मृतदेह आढळला. प्राथमिक तपासानुसार, मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रथमदर्शनी बलात्कारानंतर गळा दाबून हत्या केल्याचे हे प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे.
शुक्रवारी सकाळी काही लोक जिल्ह्यातील न्यूटाऊनमधील लोहा पुलाजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले तेव्हा त्यांना झुडपात एका तरुणीचा मृतदेह पडलेला आढळला. त्यांनी तात्काळ न्यूटाऊन पोलिस ठाण्याला कळवले. उशीरापर्यंत मृत तरूणीची ओळख पटली नव्हती. पोलिस स्थानिक लोकांची चौकशी करत आहेत आणि परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेज स्कॅन केले जात आहे.
बलात्कार आणि हत्येनंतर गुन्हा त्याच ठिकाणी झाला होता की मृतदेह तेथे आणून टाकण्यात आला होता, याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृताची ओळख पटविण्यासाठी, जवळच्या पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला जात आहे आणि मुलगी बेपत्ता झाल्याबद्दल दाखल केलेल्या तक्रारींची देखील चौकशी केली जात आहे.