पिंपरी : पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर हादरून गेले आहे. पिंपरीच्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आणखी एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव मध्ये एकावर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही देखील कॅमरामध्ये कैद झाली आहे. यात नागेश कराळे नामक व्यक्तीचा यात जागीच मृत्यू झाला आहे.
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. चारचाकी वाहनांमधून आलेल्या तीन मारेकऱ्यांनी नागेश कराळेवर गोळीबार केला. नागेश कराळे स्वतःच्या वाहनात बसताच हे मारेकरी तिथे पोहचले आणि त्यांनी नागेश कराळे यांच्यावर पिस्तूलमधून एकापाठोपाठ गोळ्या झाडून त्याची हत्या केली. जुन्या वादातून ही हत्या झाला असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे.
गेल्या सहा दिवसांत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही तिसरी हत्या आहे. शनिवारी पिंपळेगुरवमध्ये भरदिवसा एकावर गोळीबार झाला. बुधवारी तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हाथोड्याने प्रहार करून हत्या करण्यात आली आणि गुरुवारी पुन्हा हा गोळीबार झाला. त्यामुळे पिंपरी शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.