नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत महिलांवरील बलात्काराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यांत बलात्काराच्या घटनांमध्ये साडेसात टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा प्रकारे महिलांवर दररोज सरासरी सहा बलात्काराच्या घटना घडत आहेत.
दिल्ली पोलिसांनी सहा महिन्यांत जाहीर केलेल्या आकडेवारीवरून या वर्षात आतापर्यंत 1100 बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले आहे. आकडेवारीनुसार, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर पती आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्येही 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2021 ते 15 जुलै 2021 या कालावधीत दिल्लीत महिलांविरोधातील 6,747 गुन्ह्यांची नोंद झाली होती, जी 2022 मध्ये वाढून 7,887 झाली. शहरात 15 जुलैपर्यंत 1,100 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते, तर गतवर्षी याच कालावधीत 1,033 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते.
महिलांची शालीनता भंग करण्याच्या हेतूने त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या 1,244 च्या तुलनेत यावर्षी अशा 1,480 प्रकरणांची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार, महिलांच्या विनयभंगाची प्रकरणे 2021 मधील 229 प्रकरणांवरून 2022 मध्ये 225 इतकी घटली आहेत. महिलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
या वर्षी महिलांच्या अपहरणाच्या 2,197 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. जी गेल्या वर्षीच्या गुन्ह्यांपेक्षा 317 अधिक आहे. आकडेवारीनुसार, 2021 मध्ये 2,096 च्या तुलनेत 2022 मध्ये पती आणि सासरच्या लोकांकडून क्रूरतेच्या एकूण 2,704 प्रकरणांची नोंद झाली. हुंडाबळी 69 तर हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत सात गुन्हे दाखल झाले आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिलांमध्ये जागरुकता वाढली असून पोलीस महाविद्यालये, शाळा आणि परिसरात महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत आहेत. बलात्काराच्या बहुतांश घटनांमध्ये आरोपी पीडितेला ओळखतात. ते म्हणाले की, पूर्वी महिला कायद्यांबाबत फारशा जागरुक नव्हत्या पण आता त्या त्यांच्यावरील गुन्ह्यांबाबत तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. भारतीय सामाजिक जागरूकता संस्थेच्या कार्यकर्त्या छवी मेथी यांनी राष्ट्रीय राजधानीत महिलांवरील गुन्ह्यांवर चिंता व्यक्त केली.