नागठाणे (प्रतिनिधी)- पुणे -बंगळुरू महामार्गावर वळसे (ता. सातारा) गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने पुढे चाललेल्या तीन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात राजेंद्र हणमंत घाडगे (रा.समर्थगाव ता. सातारा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर हा थरारक अपघात झाला.
कारने ठोकरलेल्या दुचाकींपैकी एका दुचाकीवरील स्वार राजेंद्र घाडगे अक्षरशः चेंडूसारखा उडून महामार्गावरून सुमारे २५ ते ३० फूट खाली सेवारस्त्यावर डोक्यावर पडले. अमर शिवाजी पानस्कर (वय ३६, रा. मल्हारपेठ ता.पाटण), कुमार माणिक पोतदार (वय ३६, (रा.सासपडे ता.सातारा) दुचाकीवरील स्वारही जखमी झाले आहेत.
अपघातानंतर साताराकडे जाणाऱ्या कारचे तोंड पुन्हा कराड बाजूकडे झाले होते. एक दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. वळसे ग्रामस्थानी तातडीने जखमींना उपचारासाठी सातारा येथे पाठवले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.