पुणे – हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरुन उडी मारुन एका वेटरने आत्महत्या केली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात हॉटेल पेंट हाऊस प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उडी मारण्याअगोदर त्याने फेसबुक लाईव्ह केले होते. त्यामध्ये त्याने हॉटेल पेंटहाऊस असा उल्लेख केला होता. अरविंदसिंग भुपालसिंग राठोड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, राठोड हा हॉटेल पेंट हाऊसमध्ये वेटरचे काम करत होता. त्याने 17 नोव्हेंबरला रात्री हॉटेलच्या 13 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येसंदर्भातील क्लिप त्याच्या नातेवाईकांना मिळाली आहे. त्यावरुन त्याने हॉटेलमधील कोणाच्यातरी त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार देण्यात आली आहे. तो अविवाहित असून एक महिण्यापुर्वीच हॉटेल पेंट हाऊसमध्ये कामाला लागला होता. रात्री नऊच्या सुमारास त्याने उडी मारली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन भोसले करत आहेत.