पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने हाहाकार उडविला असून आज शहरातील बाधितांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. आज दिवसभरात तब्बल 314 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वच्या सर्व बाधित हे शहरातील असून हद्दीबाहेरील मात्र वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 113 दिवसांमधील बाधितांच्या संख्येने आज उच्चांकी पातळी ओलांडली असून शहरातील बाधितांची संख्या 3544 वर पोहोचली आहे.
बुधवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (गुरुवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 314 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सर्वच्या सर्व बाधित हे शहरातील असून आज बाधितांमध्ये महापालिका हद्दीबाहेरील कोणाचाही समावेश नाही. गोखलेनगर पुणे येथील एका 72 वर्षीय व्यक्तीवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे शहराबाहेरील मृतांची संख्या 31 वर पाहोचली असून आतापर्यंत शहरातील 47 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 78 झाला आहे.
आतापर्यंत शहरातील 2154 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 194 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 168 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 20409 जणांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 15246 जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 1672 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयीत असलेले 1479 जण महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 1364 आणि शहराबाहेरील 76 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
संशयितांची संख्या वाढली
पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या वाढत असताना दिवसेंदिवस संशयीतांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज एकाच दिवसात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तब्बल 1479 संशयीत दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयित दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर 1672 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत असल्यामुळे करोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.