शिवतारे- जगतापांच्या कलहात गुंजवणी “स्तब्ध’

– रोहन मुजुमदार

पुणे  – पुरंदर तालुक्‍यासाठी वरदान असलेल्या गुंजवणी प्रकल्पावरून माजी मंत्री विजय शिवतारे आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्यात जुंपली होती; मात्र आता या प्रकल्पाच्या पाइपलाइनचे काम पुरंदर तालुक्‍यात सुरू केल्यानंतर हे काम पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी थांबवल्यावरून शिवतारे आक्रमक झाले

असून ते थेटपणे टीका करीत आहेत. त्याला आता आमदार जगतापही प्रत्युत्तर देत असल्याने आजी-माजी आमदारांच्या भांडणात पुरंदरवासीय तहानलेलेच राहणार का, गुंजवणीचे भवितव्य काय, असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गुंजवणी प्रकल्पाकडे पाहिले जाते. प्रकल्पासाठी शिवतारे यांनी अनेक खस्ता खाल्या आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करून दाखवणारच, असा विडा त्यांनी उचलला आहे.

गुंजवणी प्रकल्पातून केवळ पुरंदरसाठी उपसा योजनेच्या निविदा प्रसिद्ध करून यातून भोर, वेल्हे, हवेली तालुक्‍याला वगळल्याने त्यावेळी भोरचे आमदार संग्राम थोपटे आक्रमक झाले होते. त्यांनी प्रकल्पास विरोध दर्शविला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर बंद पाइपलाइनच्या कामाला सुरुवात झाली होती.

तर महिना, सव्वामहिन्यापूर्वी हे काम पुरंदर तालुक्‍यातील तोंडल येथे सुरू होते; मात्र हे काम आमदार जगताप यांनी बंद पाडले आहे. गुंजवणीच्या प्रश्‍नावरून महाविकास आघाडीतील बिघाडीस जगताप जबाबदार असतील, असा घणाघात शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तर 15 दिवसांत काम पुन्हा सुरू झाले नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आरोपांचे खंडन करीत आमदार जगताप म्हणाले की, गुंजवणी प्रकल्प पुरंदर तालुक्‍यासाठी वरदान असला तरी तो पूर्णत्वास नेताना शेतकऱ्यांच्या फायद्याऐवजी स्वत:चा फायदासाठी राबविण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. तर हा केवळ कमिशन खाण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा घणाघात त्यांनी शिवतारे यांचे नाव न घेता केला आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रश्‍नावरून पुरंदरमध्ये रणकंदन माजणार, याचे संकेत मिळत आहेत.

शिवतारे म्हणाले की…
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तवाहिन्यांना याबाबत माहिती देत आमदारांच्या सूचनेमुळे काम बंद करावे लागल्याची कबुली दिली आहे. आर्थिक लाभासाठी आमदार काम बंद करीत आहेत, अशी चर्चा तालुक्‍यात असून चिरीमिरीसाठी दुष्काळी भागाचे पाणी अडवणे हे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे.

आ. जगताप म्हणाले की…
गुंजवणी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यांची जलसंधारणाच्या कामातील चोरी लवकरच उजेडात येणार असून त्यांच्या काळातील जलयुक्‍त शिवार योजनेची चौकशी सुरू आहे. गुंजवणी प्रकल्पाचे भांडवल करून तालुक्‍यातील जनतेला फसवण्याचे काम विरोधकांनी केले आहे.

पाणी कोणी पळवणार तर नाही ना?
राज्यातील राजकारणाने वेगळी दिशा घेतली असून शिवसेनेने भाजपशी फारकत घेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली जुळवून घेतले आहे. त्यामुळे राज्यात हे एकत्र दिसत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र अद्यापही तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पचनी पडलेले दिसत नाही.

सध्या प्रकल्पावरून भोर-वेल्हे तालुका शांत असला तरी पुरंदर तालुक्‍यातील आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक द्वंद रंगले आहे. पण या राजकीय चिखलफेकीत पुरंदवासियांचे पाणी कोणी पळवून तर नेणार नाही ना, अशी भीती आता व्यक्‍त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.