डॉ. अमोल कोल्हेंचे शिवसुराज्य

शिवसुराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार : उदयनराजे भोसले असणार स्टार प्रचारक

आळेफाटा – सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजप व शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. आता पक्षाला सावरण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सरसावले असून शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने शिवसुराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे स्टार प्रचारक म्हणून त्यांना साथ देतील. भाजप आणि शिवसेनेच्या यात्रांनंतर राष्ट्रवादीही 6 ऑगस्टपासून शिवसुराज्य यात्रा काढणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मातब्बर नेते पक्षाला रामराम ठोकत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. जाणता राजा अर्थात शरद पवार ही गळती रोखण्यासाठी धावपळ करीत आहेत. लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा झंझावात निर्माण करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्यासाठी अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. अमोल कोल्हे हे ऐतिहासिक मालीकेमधून घराघरात आणि मना मनात पोहचले आहेत तसेच त्यांनी आपल्या मतदार संघातील जनतेशी निगडीत असलेले प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडल्यामुळे त्यांच्या भाषणाची दखल दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन त्यांचे कौतुक केले आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे यापूर्वी शिवसेनेत होते मात्र पक्षाला त्यांचा फायदा करुन घेता आला नाही. डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो व ते लोकसभेच्या निवडणुकीत शिवाजीराव आढाळराव यांना लढत देऊन जिंकू शकतात हेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हेरले व त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्यावर अभिनेता म्हणून विरोधकांनी टीका केली; परंतु त्यांनी विरोधकांना सौम्य आणि मृदू भाषेत त्यांच्या टीकेला उत्तर दिले व लोकसभेच्या निवडणुकीत ते विजयी झाले. डॉ. अमोल कोल्हे यांचे वकृत्त्व व विरोधकांवर टीका न करताही आपल्या विशेष शैलीत उत्तर देण्याची त्यांची असलेली खुबी हे सर्व गुण त्यांच्यात आहेत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वजन वाढले आहे.

शिवस्वराज्य यात्रेची शिवजन्मभूमितून सुरुवात
डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा उभारी देऊ शकतात, हा आत्मविश्वास शरद पवार यांना असल्यामुळेच पवारांनी डॉ. कोल्हे यांच्यावर शिवस्वराज्य यात्रेची जबाबदारी टाकली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेस तोडीसततोड उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सहा ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु करणार आहेत. या यात्रेची सुरुवात शिवजन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून होणार आहे. दोन टप्प्यांत ही यात्रा होणार असून या यात्रेचा समारोप रायगड किल्ल्यावरून होणार आहे. या यात्रेची सर्व जबाबदारी डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

“फिनिक्‍स’ भरारीची अपेक्षा
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेते भाजपा व शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत नविन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. या नवीन चेहऱ्यांना या शिवस्वराज्य यात्रेमधून बळ मिळणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेल्या या यात्रेमधून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढणार आहे. त्यामुळे एखाद्या फिनिक्‍स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा भरारी घेऊ शकतो, अशी आशा तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.