विधानसभेसाठी शिवसेनेची तयारी

पालिकेच्या गटनेतेपदी पृथ्वीराज सुतार यांची नियुक्‍ती

पुणे – विधानसभा निवडणुकांच्या तोंडवर शिवसेनेकडून शहरात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून शहरातील शहरप्रमुख हे पद रद्द करण्यात आलेले असून संघटनात्मक बांधणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत.

हे अध्यक्ष नेमताना संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्यात आले असून आठ विधानसभा प्रमुखांची निवड करताना विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, ही संधी देण्यात आलेले पदाधिकारीच विधानसभेचे दावेदार असणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या फेरबदलात महापालिकेचे गटनेतेपदही बदलण्यात आले असून आता संजय भोसले यांच्याकडे असलेली ही जबाबदारी पृथ्वीराज सुतार यांच्याकडे देण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीनंतर शहर शिवसेनेत काहीच अलबेल नसल्याने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यातच, लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेकडून एकत्र लढविण्यात आली होती. त्यानंतर विधानसभेसाठी दोन्ही पक्ष एकत्र राहणार असल्याची घोषणा या पूर्वीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.

त्यामुळे पुण्यातील जागा वाटपाकडे पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पक्षाकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून पदाधिकारी बदलण्यात आले आहेत. मात्र, शहरप्रमुख हे पद स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, सर्वच मतदारसंघांतील ताकद वाढविण्याच्या उद्देशाने पदाधिकारी नेमले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.