नाशिक : राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंचा शिलेदार पक्षाचे उपनेते अद्वय हिरे नाशिक जेलमधून बाहेर आले आहे. तब्बल 9 महिन्यांपासून ते नाशिकच्या तुरुंगात होते. अखेर आज त्यांची सुटका करण्यात आली. अद्वय हिरे यांच्या समर्थकांनी नाशिक कारागृहाबाहेर मोठी गर्दी केली होती, तसंच त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. कारागृहातून बाहेर येताच अद्वय हिरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे.
काय म्हणाले अद्वय हिरे?
‘आज आपल्या देशात काय चाललंय आपण सगळे पाहतो आहे. या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं. या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यात जे लढणार आहेत, त्या सगळ्यांना तुरुंगात जावं लागणार आहे. पुन्हा तुरुंगात जायची वेळ आली तर माझी पूर्णपणे तयारी आहे. दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई चालू राहील’, असं हिरे म्हणाले आहेत.
‘या केसमध्ये कोणताही दम नाही, मी निश्चितपणे निर्दोष सुटेन. माझा न्यायालयावर विश्वास आहे. या सगळ्यांची उत्तरं आम्ही कोर्टात दिली आहेत आणि येणाऱ्या काळातही देऊ. मी शिवसैनिक आहे. उद्धव साहेब आणि राऊत साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम असतो. ते जो आदेश देतील त्या आदेशाचं मी पालन करेन. पक्षाने आदेश दिल्यास जी निवडणूक सांगतील ती मी लढेन’, असं सूचक विधान अद्वय हिरे यांनी केले आहे.
अद्वय हिरे यांना का झाली होती अटक?
रेणुका सूतगिरणी प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली होती. रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने 30 कोटींच्यावर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना अटक केली होती. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात.
कोण आहेत अद्वय हिरे ?
अद्वय हिरे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते भाजपमध्ये होते. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर दादा भुसे शिंदे गटासोबत राहिले. यामुळे उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना ठाकरे गटात घेऊन दादा भुसे यांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला. दादा भुसे यांचे कट्टर विरोधक ते आहेत. त्यांना शिवसेनेचे उपनेते करण्यात आले. त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे.