मुंबई – अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या संभाव्य उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लटके यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. लटके यांचा राजीनामा उद्या (शुक्रवारी) 11 वाजेपर्यंत स्वीकारा असा आदेश कोर्टाने मुंबई महापालिकेला दिला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे अंधेरीची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. याजागी शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांना तेथील पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. त्यासाठी त्यांनी राजीनामाही दिला, मात्र तो महापालिका आयुक्तांकडून स्वीकारण्यात येत नव्हता.
14 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची मुदत संपणार असल्याने ठाकरे गटापुढे अडचण निर्माण झाली होती. यामुळे ठाकरे गट महापालिकेविरोधात हायकोर्टाते गेले होते. अखेर आज हायकोर्टाकडून ठाकरे गटाला दिलासा मिळाला असून लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार असणार आहे. भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.