रेडा – इंदापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील देवस्थान व दक्षिण प्रयाग म्हणून नावलौकिक असलेले लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेत समान वाटा देऊ असा शब्द दिला असतानाही ते शब्द पाळत नाहीत. त्यांना सद्बुद्धी द्या, असे साकडे घालण्यासाठी व शिवसेनेचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरे होऊ दे, म्हणून चक्क माळशिरस तालुक्यातील शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कुलदैवताला दिंडी आणून हरिनामात साकडे घातले.
यावेळी युवा सेनेचे तालुका प्रमुख गणेश इंगळे व अकलूज शहराध्यक्ष शेखर खिलारे यांनी माहिती देताना सांगितले की, दिलेला शब्द न पाळणारे व शिवसेनेची फसवणूक करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी देण्यासाठी त्यांच्याच कुलदैवताला श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर या ठिकाणी युवा सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने संगमपासून पायी दिंडी काढून व महाआरती करण्यात आली.
येथील देवस्थान हे जागृत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमदार आदित्य ठाकरे यांना आशीर्वाद मिळेल. आमच्या युवा शिवसैनिकांनी लक्ष्मी नरसिंह देवस्थानला ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे घातले आहे. या पायी दिंडीमध्येउपजिल्हा प्रमुख सोनू पराडे पाटील, महादेव बंडगर, पिंटू तात्या चव्हाण, नाना पराडे, सागर इंगळे, भैय्या पराडे, चंदू पराडे, मिलिंद मोरे, अमर सरवदे, आबा महाडिक, बबन पराडे, कल्याण इंगळे, दत्ता साळुंखे, लाला भोई, नवनाथ इंगळे, अक्षय पराडे, विकी पराडे, शिवबा खिलारे यांच्यासह युवा सेना आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.