पुणे पालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेने सोडली डुकरे

भाजपच्या आमदारांचाही सहभाग : पाणीप्रश्‍न, अस्वच्छतेचे मुद्दे

पुणे – पाणी प्रश्‍न, भटक्‍या डुकरांचा त्रास, रस्त्याचा प्रश्‍न, नो हॉर्कस झोनची अंमलबजावणी यांसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी सत्तेतील वाटेकरी पक्ष शिवसेनेला महापालिकेसमोर आंदोलन करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, यामध्ये भाजपचे आमदार योगेश टिळेकर हे देखील सहभागी झाले होते. डुकरांबद्दलच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी चक्क महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चार डुकरे सोडली, त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.

“हडपसर आणि महंमदवाडी परिसरात पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही. जेथे पाणी येते, ते अत्यंत कमी दाबाने येते. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात भटक्‍या डुकरांची मोठी समस्या निर्माण झाली आहे,’ असे आंदोलकांनी सांगितले.

हांडेवाडी रस्तावरील नो हॉकर्स झोनची अंमलबजावणी केली जात नाही. वेळोवेळी आवाज उठवण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. या सर्व प्रश्‍नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात शिवसैनिकांसह हडपसरचे आमदार योगेश टिळेकर आणि भाजपचे काही नगरसेवकही सहभागी झाले होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला शिवसैनिक हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर चार डुकरे सोडली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांची पळापळ झाली. त्यानंतर प्रवेशदारासमोर “पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाचा बापाचं’, “आमचा परिसर डुक्करमुक्‍त झालाच पाहिजे’, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

आठ दिवसात प्रश्‍न सोडविणार -आयुक्त
रामटेकडी येथील पाण्याची टाकी ताबडतोब सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्‍न सुटेल. नागरिकांना पाण्याची वेळ वाढवून देण्यात येईल. डुकरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिका मोहीम राबविणार आहे. हांडेवाडी रस्ता येथील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात येईल. येत्या आठ दिवसांत हे प्रश्‍न सोडविण्यात येईल, असे आश्‍वासन आयुक्त सौरभ राव यांनी शिष्टमंडळाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)