शिरूर लोकसभा मतदारसंघातील पराभवातून शिवसेनेने सावध होण्याची गरज

आंबेगावात संघटनाप तळीवर अभाव दिसल्याने पदाधिकारी बदलण्याचा सूर

रमेश जाधव/रांजणी: शिरूर लोकसभा मतदारसंघातील स्वतःच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मोठ्या मताधिक्‍याने पिछाडीवर राहिले. लोकसभेची निवडणूक लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतातरी शिवसेनेने बोध घेऊन पक्षश्रेष्ठींनी शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख पद बदलावे, असा सूर तालुक्‍यातील सर्वसामान्य आणि निष्ठावंत शिवसैनिक आळवू लागले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आढळराव पाटील यांना आंबेगाव तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात मतांचा फटका बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना तालुक्‍यातून सुमारे 26 हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे तालुक्‍यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी झाले की काय, असाही सवाल आता उपस्थित झाला आहे. खरेतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील संभाजीराजांची भूमिका आणि जातीय समीकरणाचा परिणाम कोल्हे यांच्या मताधिक्‍यात वाढ करणारा ठरला, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.

सध्या आंबेगाव तालुक्‍यातील शिवसेनेची राजकीय परिस्थिती पाहिली तर आढळराव पाटलांभोवती राहणारा ठराविक पदाधिकाऱ्यांचा वर्ग तर त्याउलट तालुक्‍यातील काम करणारा निष्ठावंत शिवसैनिक असे दोन गट दिसतात. सच्चा शिवसैनिक आढळरावांपासून दूरच राहिल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या शिवसैनिकांना तालुका पातळीवरील पदाधिकारी, मानसन्मान देत नसल्याची भावनाही शिवसैनिकांमध्ये आहेच. त्यामुळे तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या नव्याने केल्या जाव्यात, असा सूर शिवसैनिकांमध्ये आळविला जात आहे. गेली काही वर्षे शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून काम पाहणारे सुनील बाणखेले यांनी तालुक्‍यात कोणत्याही प्रकारचे पक्षसंघटना वाढीसाठी काम केले नसल्याचा आरोप शिवसैनिकांकडून होत आहे. जे पदाधिकारी स्थानिक पातळीवर काम करतात त्या पदाधिकाऱ्यांना तालुकाप्रमुख या नात्याने अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची पक्षसंघटना वाढीची उपाययोजना तालुका प्रमुखांकडून झाली नसल्याच्या तक्रारी सर्वसामान्य शिवसैनिक करत आहेत. यापुढील काळात शिवसेनेचे तालुक्‍यात खऱ्या अर्थाने बळकटीकरण करायचे असेल, तर तालुक्‍यातील सर्व पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी पक्षश्रेष्ठींनी निवडावी, अशी प्रमुख मागणी तळागाळातील शिवसैनिकांकडून होत आहे.

पंचायत समितीचे विद्यमान सदस्य प्रा. राजाराम बाणखेले यांनी दोन वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष पंचायत समितीची निवडणूक लढविली आणि ते निवडूनही आले. आजही शिवसेनेला प्रा. राजाराम बाणखेले यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकाची उणीव भासत असल्याची प्रतिक्रिया निष्ठावंत शिवसैनिक देतात.

तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्राबल्य असताना शिवसेना बळकटीकरणासाठी सध्याच्या तालुका पातळीवरील कार्यकारिणीतून कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. आगामी काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला आंबेगाव तालुक्‍यात मोठे मताधिक्‍य मिळाल्याने पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचाही विश्‍वास अधिक दुणावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला आंबेगाव तालुक्‍यात खऱ्या अर्थाने शह द्यायचा असेल तर तालुक्‍यातील शिवसेनेचे बळकटीकरण होणे तितकेच गरजेचे आहे.

आंबेगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऍड. जयश्री पलांडे, अक्षय आढळराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांची नावे चर्चेत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील शिवसेना पक्षाची परिस्थिती पाहता सध्या आंबेगाव तालुक्‍यातील शिवसेना पक्ष राजकीयदृष्ट्या खिळखिळा झाला आहे. तालुक्‍यात शिवसेनेला नवीन ऊर्जा प्राप्त होण्यासाठी तालुकाप्रमुख पदाची सूत्रे बदलून नव्या दमाचा, नव्या जोमाचा तालुकाप्रमुख म्हणून निष्ठावंत शिवसैनिकाला संधी देण्याची मागणी शिवसैनिकांकडून होत आहे.


जनतेच्या मनातील खासदार

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिवाजी आढळराव पाटील 2019च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. मात्र, आढळरावांचा पराभव आजही शिवसैनिकांना आणि सामान्य जनतेला मान्य नाही. लग्नपत्रिका असो, वा कुणाच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम, पत्रिकेत नाव छापताना आजही सर्वसामान्य जनता शिवाजी आढळराव पाटील यांचे पत्रिकेत नाव छापताना खासदार शिवाजी आढळराव पाटील असाच नामोल्लेख करताना दिसत आहे. त्यामुळे आढळराव पाटील पराभूत झाले असले तरी जनतेच्या मनातील खासदार म्हणून आढळराव पाटलांची छबी आजही जनतेच्या मनात तशीच शाबूत आहे.
फोटो- धनुष्यबाणाचा घ्यावा, चौकटीत आढळराव पाटील

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.