शिवसेना खासदारकीची “हॅट्ट्रिक’करणार का?

प्रा.डी.के.वैद्य

अकोले – लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजून पंधरवडा लोटला असला तरी, शिर्डी लोकसभा मतदार संघातील अकोले विधानसभा मतदार संघ मात्र, अजूनही शांत आहे. निवडणूक संबंधित संभाव्य उमेदवार अकोल्यात केव्हा येतात? कुणाला भेटतात? याचा सुगावाही समाज व सामान्यजनांना लागत नाही. यातच सर्व काही आले. 2009 ची निवडणूक सोडली, तर गेल्या पन्नास वर्षात अकोलेकरांनी अनेकदा मतदान न करता बघ्याचीच भूमिका घेतली. 2009 मध्ये अकोले तालुक्‍याचे सुपुत्र भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेचे उमेदवार होते.

अकोलेकरांनी ही निवडणूक हातात घेतली.त्यामुळे त्यांना सुमारे 8 हजार 500 हजाराचे मताधिक्‍य त्यांना मिळाले. तस अकोले विधानसभा मतदारसंघ 1977 पासून ते 2009 पर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघाला जोडला होता. तेव्हा उमेदवार नाशिकला ठरायचे. तो निवडून आला की क्वचितच अकोले मतदार संघाकडे यायचे. नाशिक लोकसभा मतदार संघाला प्रत्येक वेळी नवा चेहरा निवडून येण्याची परंपरा राहिलेली. शिर्डीत तेच वारे वाहिले. आता तिसऱ्या वेळेला ही परंपरा या मतदारसंघात राहणार आणि खासदार नाशिक लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच नवा चेहरा राहणार काय? असा एक प्रश्‍न सामान्यांना पडलेला आहे.

निवडणुकीचे अजूनही एक वैशिष्ट्‌य म्हणजे अकोल्यात जेव्हा शिवसेना- भाजपला 14 हजारच्या पुढे मतदान गेले. तेव्हा नाशिकचा खासदार हा शिवसेना-भाजपचा निवडून आलेला होता व जेव्हा हे मताधिक्‍य 14 हजार पेक्षा कमी राहिले होते. तेव्हा नाशिकचा खासदार कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा निवडून आलेला होता. 2009 ला अकोले मतदारसंघ शिर्डी मतदारसंघाला जोडला गेला. त्यानंतर दोन्ही वेळेला अकोले मतदारसंघाच्या मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मताधिक्‍य दिलेले आहे. शिर्डीचा यापूर्वीचा दोन्ही वेळचा खासदार हा शिवसेनेचा निवडून आलेला आहे. त्यामुळे अकोले मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीचा कलदर्शक असा म्हटला तर ते चुकीचे ठरणार नाही.

2014 मध्ये शिवसेनेचे तिकीट मिळूनही भाऊसाहेब वाकचौरे यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र ही गोष्ट मतदारांना आवडली नाही.त्याचा पराभव झाला. या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष म्हणून उभे राहण्याची घोषणा केली आहे. मात्र यामुळे त्यांच्या राजकीय अडचणीत आणखी वाढ होईल, अशी शक्‍यता त्यांचे हितचिंतक व्यक्त करताना दिसून येत आहे. मुख्य पक्षांकडून उमेदवारांची घोषणा झाली आहे. रोज रोज नवनवीन वावड्याही उठताहेत. उमेदवार बदलण्याच्या विशेषतः कॉंग्रेस उमेदवार बदलण्याच्या वावड्यांना विशेष जोर आला आहे. आता खरे उमेदवार माघारीनंतरच कळू शकतील.

विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. 2004 सालानंतर “पंजा’ हे कॉंग्रेसचे चिन्ह या मतदारसंघातून जवळजवळ गायब झाले. याला कारण स्थानिक प्रभावी असा नेता या पक्षाकडे नाही आणि थोरला भाऊ राष्ट्रवादीच्या रूपात असल्याने आणि धाकटा भाऊ कॉंग्रेसच्या रुपात असल्याने यांचेही सूत कधी जमलेच नाही. याचा परिणाम स्थानिक निवडणुकांत कधीही कॉंग्रेसचा प्रभाव जाणवला नाही. परिस्थिती इतकी खालावली की मागील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना एकही उमेदवार निवडणुकीसाठी मिळू शकलेला नाही. त्यामुळे चाळीस वर्षे वयोगटाच्या पुढील जे मतदार आहेत. त्यांचा अपवाद वगळला तर त्याखालील जे काही मतदार आहेत. त्यांना पंजा हे चिन्ह विस्मरणात गेल्यासारखे दिसून येते.

“संगमनेर कॉंग्रेस’ आणि “लोणी कॉंग्रेस’ यांच्यातून विस्तव जात नाही. तर “लोणी कॉंग्रेस’ व “कोपरगाव कॉंग्रेस’ यांची साधी तोंडओळखही नाही.”श्रीरामपूर कॉंग्रेस’ कै गोविंदराव आदिक यांनी जागेवर ठेवली आहे. पण जागेवर ठेवलेल्या श्रीरामपूर कॉंग्रेसचा नेवासे कॉंग्रेसशी उभा दावा आहे. तीच स्थिती राहुरीची आहे. अकोले कॉंग्रेसचे वितुष्ट नसले तरीही संगमनेरची मैत्री जाणवत नाही हे तितकेच खरे. दुसरीकडे अकोले शिवसेना व भाजप यांची गेल्या साडेचार वर्षात तरी कधी गाठभेट झाल्याचे अकोलेकरांच्या ऐकिवात नाही. शिवसेनेतील दोन गट, भाजपअंतर्गत दोन गट हे एकमेकांचे तोंड पहायला तयार नाहीत. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीमध्ये अकोले विधानसभा मतदारसंघ सतराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे.

अकोले तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस वगळता संघटनात्मक पातळीवर अन्य पक्षांची अशी स्थिती दिसते. अर्थात लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय प्रश्‍नांचा प्रभाव मतदार मतदारांवर असतो असे म्हणतात. किंवा “मोठ्या वादळात वाघ आणि बोकड एका गुहेत शिरले, तर वाघ त्याला सांभाळून घेतो.’ तसे कदाचित निवडणुकीच्या वादळात होईल आणि ते लवकरच नजीकच्या काळात दिसू नही येईल. शिवसेनेचे विद्यमान खासदार अकोलेकरांच्या संपर्कात कमीत कमी काळ राहिले, अशा प्रकारची “कुरकुर’ मतदारसंघात ऐकू येते आहे. तर कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार हे तसे बाहेरच आहेत. म्हणजे श्रीरामपूरचे विद्यमान आ.भाऊसाहेब कांबळे आघाडीकडून उभे आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांची अपक्ष म्हणून संभाव्य उमेदवारी, वंचित आघाडीचे प्रसाद साबळे आणि भाकपचे बन्सी सातपुते असेही नाव सध्या चर्चेत येत आहेत. मात्र खरी लढत ही शिवसेना व कॉंग्रेसमध्ये होईल असे सध्याचे चित्र आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.