उजनीचे पाणी पेटणार? शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला रक्तरंजित संघर्षाचा इशारा; म्हणाले…

सोलापूर – उजनी धरणातील पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी इंदापूरला देण्यावरून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सध्या वाद रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी देखील ठाकरे सरकारविरोधात दंड थोपटत थेट ‘रक्तरंजित लढाईला तयार रहावे’ असा इशारा दिला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दिपक भोसले यांनी उजनीचे पाणी इंदापूरला देण्याच्या  निर्णयाविरोधात जनजागृती आंदोलन छेडले आहे. यामाध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या घराबाहेर हलगी वाजवण्यात येत आहे. आज सांगोलाचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले.

यानंतर आमदार शहाजी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.  ते म्हणाले, “सोलापूरला सिंचनासाठी इतर कोणत्याही धरणावर अवलंबून राहता येणार नसल्याने उजनी जिल्ह्याचा आणि शेतकऱ्यांचा प्राण आहे असं त्यांनी सांगितलं. हे अन्यायकारक असून शिवसेना आमदार म्हणून सर्व शक्ती पणाला लावणार असून कायदेशीर लढाई लढू आणि रक्तरंजित लढाईला तयार रहावे”

…तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं

“राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आह हे देशभर सांगायचं ही पवारांची पद्धत आहे. शरद पवार राज्याचे नेते पण फक्त बारामतीचा विकास केला,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

यावेळी बोलताना शहाजी पाटील यांनी, “उजनी धरणातून शरद पवारांनी बारामती एमआयडीसी, बारामती शहर आणि सिनर्मास प्रकल्पाला पाणी नेलं. एवढं पाणी देऊनही शरद पवारांना पाणी कमी पडतंय असं वाटत आहे. उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची काही यंत्रणा असती तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं,” अशा शब्दांत  संताप व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.