महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यातील घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. शिंदे सरकारने मेट्रो कारशेडबाबत निर्णय घेतल्यानंतर अनेक वेगवेगळ्या विषयांना हात घालायला सुरुवात केली आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडी चौकशी झाली त्यानंतर राऊत यांनी मलाही गुवाहाटीच्या ऑफर आल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
खासदार संजय राऊत यांची तब्बल दहा तास ईडीने चौकशी केली. रात्री पावणे दहाच्या सुमारास राऊत ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर कथित पत्राचाळ प्रकरण प्रकाशात आले होते. यामुळे राऊत यांनी देखील आपण तपास यंत्रणांना सहकार्य करणार असल्याची भूमिका घेतली होती.
‘मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती. मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही’. असा खुलासा करत राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपा सरकारला टोला लगावला आहे. मात्र राऊत यांच्या या दाव्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राऊत यांनी भाजपवर खरमरीत टीका केली होती.
भाजपाला शिवसेनेची मुंबईतील ताकद कमी करायची आहे त्यामुळे ते शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतं असल्याचेही राऊत म्हणाले.शिंदे गटाकडून फसवणूक केली जात आहे. त्यांच्या मनात आपण आपल्या नेत्याला फसवल्याची खदखद असल्याचे राऊत यांनी सांगितलं. लोकांना फसवणे ही भाजपाची पद्धत असल्याचं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.