मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे नाव सातत्याने पुढे येताना दिसत आहे. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडचा असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे. हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो.
हा वाल्मिक कराड आता तुरुंगात बंद आहे. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. 31 डिसेंबरला तो पुण्यात सीआयडीला शरण आला. त्यानंतर या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्याची माहिती आहे. यादरम्यान आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
‘या’ नेत्याने केली मुंडे बंधु-भगिनींच्या राजीनाम्याची मागणी
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.बीडच्या घटनेनंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी गजानन किर्तीकर यांनी केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.
सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
या हत्या प्रकरणात सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये IPS बसवराज तेलींसह 10 पोलीस अधिकारी असणार आहेत. आयपीएस बसवराज तेली हे या समितीचे नेतृत्व करणार आहेत. बसवराज तेली सीआयडीमधील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत. एसआयटीमध्ये सर्वच अधिकारी बीड जिल्ह्यातले आहेत.