मंचर (प्रतिनिधी) – आशा बुचके ( Asha Buchake ) यांच्या रुपाने शिवसेनेमध्ये खिंडार पडले आहे. हे फक्त खिंडार आहे. पुणे जिल्ह्यात येत्या काही दिवसांत फार मोठा भूकंप होणार आहे आणि त्याची ताकद भाजपला मिळणार आहे, असा दावा पुणे जिल्हा भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांनी केला.
शिवसेनेच्या बंडखोर नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके या मुंबई येथे भाजप पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी जात असताना मंचर बसस्थानकानजीक त्यांचे वाद्याच्या गजरात भाजपच्या वतीने स्वागत करून एरंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, संदिप बाणखेले, गणेश बाणखेले, हेमंत चिखले, सुरेश अभंग, आनंद कराळे, बाळासाहेब कोकणे, उमेश हुले, निलेश भालेराव, विकास बाणखेले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
एरंडे म्हणाले, आशा बुचके यांचा मुंबई येथे भाजप पक्षात प्रवेश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या उपस्थित झाला. संपूर्ण महाराष्ट्राची ताकद बुचके यांच्या पाठीमागे भाजप उभी करणार आहे.