मुंबई – मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या दसरा मेळाव्यात सहभागी होणार आहेत. भाजपसोबत युती जरी केली असली तरी आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, शिवाजी पार्क मैदानात गेल्या ५३ वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मेळाव्यात शिवसेनेचे प्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात. लोकसभा निवडणूक दोन आठवड्यावर असताना ‘विधानसभेवर भगवा फडकणारच, हीच ती वेळ दसरा मेळावा’ अशा शीर्षकाखाली शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
हजारो शिवसैनिक या दसरा मेळाव्याला हजर राहणार आहेत. शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यानिमित्ताने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना हा मेळावा पाहता यावा यासाठी डिस्प्ले एलईडी मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.