मुंबई – शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे गटासह भाजपने सरकार स्थापन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरु झाल्याचे दिसून आले. शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनात देखील आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. आता दसरा मेळाव्यावावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले आहेत.
दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. शिंदे गट वारंवार आम्हीच शिवसेना आहोत असं सांगत आहे. अशात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दसरा मेळाव्याची तयारी करण्याचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना काय आदेश देणार याकडे राज्यासह देशाचे देखील लक्ष लागले आहे. अशात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात आतुरता उद्धव साहेबांच्या गर्जनेची अशा आशयासह बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो पाहायला मिळत आहेत.
विशेष म्हणजे या पोस्टरवर शिवसेनेनेच निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण देखील टाकण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिंदे गटासह भाजपवर कशा प्रकारे तोफ डागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यासोबतच आदित्य ठाकरे यांच्या बरोबरीने तेजस ठाकरे देखील व्यासपीठावर दिसणार का याची उत्सुकता देखील शिवसैनिकांना लागली आहे.