युतीपूर्वीच शहरात शिवसेना- भाजपमध्ये तू तू – मै मै

महापालिकेत युती होण्याची शक्‍यता आता दुरापास्त

नगर – लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेत पुन्हा युती सत्ता शक्‍यता वर्तविण्यात आली होती.त्या दृष्टीने पावले पडत असतांना शहरात शिवसेना व भाजपमध्ये पुन्हा एकदा तू-तू, मै-मै सुरू झाल्याने आता महापालिकेत युती होण्याची शक्‍यता दुरापास्त झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून खालच्या पातळीवर जावून व्यक्‍तिगत आरोप – प्रत्यारोप शिवसेना व भाजपमध्ये होत आहे. विशेषतः महापौर बाबासाहेब वाकळे व शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी एकमेकांवर व्यक्‍तिगत आरोप सुरू केले आहे. त्यातून नगरकरांचे केवळ मनोरंजन होत आहे.

महापालिका निवडणूक शिवसेना व भाजप स्वबळावर लढले. निवडणुकीपूर्वी व निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडली नाही. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व माजी खासदार भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्यातील संषर्घ या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवला. भाजपचे बहुमत मिळणार असल्याचा दावा केला होता. परंतु 14 नगरसेवक निवडून आले. त्या तुलनेत शिवसेनेने 24 जागा मिळविल्या होत्या. निवडणूक निकालानंतर शिवसेना व भाजप युती होईल, अशी अपेक्षा होती.

परंतु भाजपने शिवसेनेला डावलून राष्ट्रवादीबरोबर युती करून सत्ता मिळाली. शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळवून देखील विरोधात बसण्याची नामुष्की आली. महापालिका निवडणुकीचा धुराडा खाली बसतो न्‌ बसतो तोच लोकसभा निवडणुकीत राज्यपातळीवर शिवसेना व भाजपची युती झाली. ही युती विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहणार असल्याचे जाहीर करून स्थानिकपातळीवर युती करण्याचे संकेत देण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांसाठी शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते एकत्रित प्रचाराला उतरले. अर्थात नगर शहरात मात्र गांधी गट वगळता अन्य भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर प्रचार सक्रिय झाले होते. त्यावेळी महापालिकेत भाजपने राष्ट्रवादीला बाजूला करून पुन्हा शिवसेनेबरोबर युती करावी अशी चर्चा सुरू झाली. भाजपच्या नेत्यांनी देखील त्याला हिरवा कंदिल दिला होता.

लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेतील राजकीय समीकरण बदलणार असे वाटत होते. निवडणूक निकालानंतर खासदार डॉ. सुजय विखे यांनी देखील राष्ट्रवादीच्या कुबड्यांची गरज नाही, शिवसेनेला बरोबर घेवून महापालिकेत पुन्हा युतीची सत्ता आणणार असल्याचे जाहीर केले. शहरातील शिवसेना व भाजप नेत्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे, खा. डॉ. विखे यांनी स्पष्ट केल्यानंतर महापालिकेत शिवसेना व भाजप युतीची सत्ता येईल, अशी आशा पल्लवीत झाली होती.

परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरात शिवसेना व भाजपमध्ये सुरू असलेला कलगीतुरा पाहता युती होण्याची शक्‍यता दुरापास्त झाली आहे. सध्या तरी महापौर, नगरसेवक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असले तरी त्याचे बोलविते धनी देखील लवकरच आमनेसामने येण्याची शक्‍यता आहे. आज बोराटे यांनी महापौरांवर आरोप करतांना बोलविता धन्यालाही सोडले नाही.

त्यामुळे राठोड व गांधी यांच्यात पुन्हा एकदा चिखलफेक होण्याची शक्‍यता आहे. हे सर्व पाहिल्यानंतर महापालिकेत भाजप शिवसेनेला सत्तेपासून दूरच ठेवणार असल्याचे स्पष्ट होत असून राष्ट्रवादीच्या बळावर भाजप सत्तेचा गाडा चालविणार असल्याचे लपून राहिलेले नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)