युती वरवरची, गोटात मात्र वेट अॅन्ड वॉच

पुणे – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी पुण्यात मात्र अद्याप युतीचे पडसाद काही उमटलेले दिसत नाहीत. ही युती वरवरची आहे, असेही काही कार्यकत्यांनी बोलून दाखवले. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी वेट अॅण्ड वॉच असेच उत्तर देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक पद्धतीनुसार पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपाकडेच राहणार असल्यामुळे आणि भाजपाकडे पुण्यासाठी चेहरा असल्याने भाजपा गोटात कॉंग्रेस, राष्ट्रवादीसारखी अस्वस्थता नाही.

पुढील महिन्यात लोकसभा निवडणूका होणार आहेत. गेले साडेचार वर्ष सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने भाजपावर टिका करण्याची एकही संधी सोडली नव्हती, त्यातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अनेक वेळा भाषणात एकला चलो ची घोषणा केली होती, त्यामुळे सेने कार्यकर्ते सुद्धा आता युती होणार नाही अशाच भ्रमात होते. त्यादृष्टीने अनेक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुद्धा केली होती. त्यात अचानक गेल्या आठवड्यात शिवसेना, भाजपाने एकत्र येत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्धार घेतला. राज्य पातळीवर वरिष्ठ नेत्यांमध्ये हा जरी निर्णय झाला असला तरी शेवटच्या फळीतील कार्यकर्त्यांपर्यत हा निर्णय अद्याप पचनी पडलेला दिसत नाही.

पुण्यात ही अद्याप युती झाल्यानंतर कुठे शिवसेना भाजपच्या नेत्यांमध्ये मनोमिलन झालेले दिसत नाही. विशेष करुन सेनेच्या नेत्यांनी अद्याप कुठलीच भुमिका शहर भाजप पदाधिकाऱ्यांबरोबर व्यक्त केलेली नाही. यासंदर्भात शिवसेनेच्या एका नेत्याने युती झाली आम्हाला आनंद झाला आहे पण लोकसभा निवडणूकीसाठी ठिक आहे पण विधानसभेला मतदार संघ कशा प्रकारे सुटतात यावर सगळे अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी काहीच बोलायचे नाही बघू पुढे काय होते ते असे स्पष्ट केले. तीच भूमिका भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. युती झाल्याचा आनंद आहे पण लोकसभा झाल्यावर विधानसभेला ही युतीमध्ये मतदार संघांचे वाटप कसे होते यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

शहरातील एका विधानसभात मतदार संघातील आमदाराने तर युती झाली तरी मी निवडणूक लढविणारच अशी भुमिका थेट जाहीर केल्याने मतदार संघाचे वाटप होताना सेना आणि भाजप नेत्यांमध्ये संघर्ष होणार हे नक्कीच आहे. त्यामुळे सध्या तरी सगळ्यांनीच वेट अॅण्ड वॉच हीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी सारे काही शांत शांत असले. तरीही विधानसभा मात्र अंतर्गत कुरघोडींनी रंगणार यात वाद नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.