शिवसेनेतर्फे पोलिसांना निवेदन
मेढा – मागील आठवड्यात मेढा येथे खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात नवविवाहितेचा मृत्यू झाला होता. यानंतर रस्त्याबाबत अनेक संघटना आक्रमक झाल्या असून अधिक तपास करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या आंदोलना पाठोपाठ शिवसेना तसेच रिटकवली ग्रामस्थांनी देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सातारा-मेढा रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अनेकवेळा आंदोलन करून सुद्धा संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत आहे. सोमवारी घडलेल्या या अपघाताचे ठिकाण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असून या ठिकाणी या अगोदर बऱ्याच वेळा अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा अपघात घडला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी शिवसेना तसेच रिटकवली ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.
निवेदन देताना शिवसेनेच्या नगरसेविका नीलमताई जवळ, पुष्पा तांबोळी, रिटकवलीचे सरपंच सचिन दळवी, शिवसेना शहर प्रमुख सचिन जवळ, बापू जवळ, सचिन करंजेकर, प्रवीण पवार, नंदकुमार तांबोळी, महेश मर्ढेकर, नारायण दुणदुले, गणेश गुलन्बे, शंकर मर्ढेकर तसेच इतर ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.