आघाडीत बिघाडी ; नगरमध्ये शिवसेना व भाजप करणार स्वंतत्र प्रचार

नगर तालुक्‍यात युती दुभंगली; आ. जगताप अन्‌ डॉ. विखेंच्या डोक्‍याला झाला ताप

नगर: नगर तालुका चार विधानसभा मतदारसंघात विभागला गेल्याने स्थानिक स्वराज्य व सहकारी संस्थांपुरताच या तालुक्‍याचे राजकीय अस्तित्व राहिले आहे. सहाजिक या तालुक्‍यातील राजकारण देखील या संस्थाभोवतीच फिरत आहे. हे राजकारण आता लोकसभा निवडणुकीतील युती व आघाडीच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना व कॉंग्रेस महाआघाडी असे लढत या तालुक्‍यात आहे. हीच लढाई आताही लोकसभेत दिसत आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या डोक्‍याला ताप झाला आहे. तालुक्‍यात शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करणार आहे. दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते एकमेकांच्या व्यासपीठावर जाणार नाहीत. तर दुसरीकडे तालुक्‍यात कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी फलकांवर फोटो व नाव टाकू देखील राष्ट्रवादी उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे.

नगर तालुक्‍यात बाजार समितीसह अन्य सहकारी संस्था, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप म्हणजे आमदार शिवाजीराव कर्डिले व राष्ट्रवादी आमदार अरूण जगताप यांच्या विरोधात कॉंग्रेस व शिवसेना यांची महाआघाडी अशी लढत होते.

कॉंग्रेसचे माजी खासदार दादा पाटील शेळके, बॅंकेचे माजी संचालक संपतराव म्हस्के तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, सभापती रामदास भोर आदी नेते व कार्यकर्ते या महाआघाडीत आहे. बाजार समितीवर आ. कर्डिले व आ. जगताप यांचे वर्चस्व असून पंचायत समिती महाआघाडीच्या ताब्यात आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युती व आघाडी झाली असली तरी तालुक्‍यात मात्र अद्यापही ही युती व आघाडी झालेली नाही. अर्थात नगर तालुक्‍याचे राजकारण जिवंत ठेवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेस व शिवसेना महाआघाडी ही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणे गरजेचे आहे. आणि तेच झाले.

लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या भाजप व शिवसेना युतीच्या एकत्रित मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी आ. कर्डिलेंना लक्ष्य केले. त्यानंतर स्वतंत्रपणे शिवसेनेच्या मेळाव्या देखील आ. कर्डिलेंवर जोरदार टिका करण्यात आली. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते वैतागले. आमच्या नेत्यांवर टिका व आरोप होणार असतील तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिली. त्यानंतर डॉ. विखे यांनी थेट बुऱ्हाणनगर गाठले. येथे आ. कर्डिलेंच्या समर्थकांबरोबर चर्चा करून शिवसेनेच्यावतीने त्यांनी माफी मागितली. तसेच यापुढे अशा प्रकारची टिका होणार नाही. नगर तालुक्‍यात कोणाला भाषणच करून दिले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

परंतू यामुळे शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यानंतर पुन्हा डॉ. विखे यांना या शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागली. भाजपचे नेते बोलले तर आम्ही त्यांना शिंगावर घेवून असा इशारा शिवसेनेने दिला आहे. सध्या तरी भाजप व शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते गेल्या आठवडाभरापासून प्रचारात दिसत नाही. त्यामुळे डॉ. विखेंसाठी हे प्रकरण चांगलेच तापदायक झाले आहे. अखेर आता भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे प्रचार करणार असल्याचे ठरले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांच्या व्यासपीठावर जायचे नाही. केवळ डॉ. विखेंचा प्रचार करायचा पण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणार नाही यांची काळजी घेण्याची विनंती डॉ. विखे यांनी केली आहे.

दुसरीकडे ते दुखणे आहे. गेल्या काही वर्षांपासून आ. जगताप यांच्या विरोधात सहकारी संस्था लढल्या. त्यांच्यावर टिका केली. आता त्या जगतापांचे कौतूक करून त्यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करणे हे कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांच्या मनाविरूद्ध आहे. कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कॉंग्रेसच्या नेत्यांना आघाडीचा धर्म पाळा अशी सुचना केली आहे. परंतू कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते अद्यापही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झाले नाही. दोन दिवसांपूर्वी आ. संग्राम जगताप यांनी नगर तालुक्‍यात दौरा केला. या दौऱ्यात राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते फिरकले देखील नाही. विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांचे फोटो व नावे फलकावर टाकण्यात आली होती. तरी देखील कॉंग्रेसचे नेते फिरकले नाही. त्यामुळे आ. जगताप अडचणीत आले आहेत. तालुक्‍यात कॉंग्रेसची तशी बऱ्यापैकी ताकद आहे. दादा पाटील शेळके यांना मानणारा मोठा वर्ग नगर तालुक्‍यात आहे. हे ताकद अजून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे आ. जगताप यांच्यासाठी डोकेदुखी वाढली असून सध्या कॉंग्रेसच्या नेत्यांचे मन जुळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संस्थांशी निगडीत यंत्रणा आ. जगतापांसाठी सक्रिय

नगर तालुक्‍यात सहकारी संस्थांच्या निगडीत येणारे पदाधिकारी व त्यांचे समर्थक मात्र आ. जगतापांसाठी सक्रिय झाले आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा हा आता प्रश्‍न नगर तालुक्‍यात पडला आहे. शिवसेना व भाजपचे काही चेहरे डॉ.विखेंच्या प्रचारात दिसत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.