नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात शिवसेना आक्रमक

शिवसेनेच्या नगरसेविका, शाखा प्रमुखांवर गुन्हा दाखल 
लोणावळा :सरसकट अतिक्रमण कारवाई, पदाधिकाऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी

लोणावळा – अतिक्रमण कारवाई करताना गरीब, श्रीमंत असा पक्षपातीपणा न करता सरसकट कारवाई व्हावी तसेच अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या शिवसेना नगरसेविका व शाखा प्रमुख यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणी करिता मंगळवारी (दि. 4) लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

या वेळी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, मावळ विधानसभा संपर्क प्रमुख गणेश जाधव, मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर, उपतालुकाप्रमुख गबळू ठोंबरे, पुणे जिल्हा महिला संघटक व नगरसेविका शादान चौधरी, शहरप्रमुख नगरसेवक सुनील इंगूळकर, नगरसेवक शिवदास पिल्ले, कल्पना आखाडे, संघटक बाळासाहेब फाटक, धनंजय नवघणे, दीपाली भिल्लारे, मनिषा भांगरे, संजय भोईर, मनिष पवार, शाम सुतार, महेश खराडे, यांच्यासह शिवसैनिक
उपस्थित होते.

या वेळी बोलताना गजानन चिंचवडे व शादान चौधरी यांनी अतिक्रमण कारवाईला आमचा विरोध नाही; मात्र ती करत असताना प्रशासनाने भेदभाव न करता ती सरसकट करावी, अशी मागणी करीत धनिकांवर पहिली कारवाई करा, गरिब स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतील.तसेच रविवारी खंडाळा येथे सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईच्या ठिकाणी नगरसेविका सिंधू परदेशी व शाखा प्रमुख मोहन मल्ला यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा साखळी उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

लोणावळा नगरपरिषदची अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना खंडाळा विभागात शिवसेना पदाधिकारी मोहन मल्ला आणि नगरपरिषद कर्मचारी यांच्या दरम्यान वादविवाद झाली. या वादविवादाचे रूपांतर नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यामध्ये झाले. तसेच हे सर्व सुरू असताना त्याठिकाणी पोचलेल्या शिवसेना नगरसेविका सिंधू परदेशी यांनी नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्याने संतप्त झालेल्या नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जोपर्यंत या दोघांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेत सोमवारी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडले. अखेर लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये शिवसेना नगरसेविका सिंधू परदेशी व शाखा प्रमुख मोहन मल्ला यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.