अकोले तालुक्‍यात शिवसेना प्रवेशाचे वारे?

प्रा. डी. के. वैद्य

भाजप-शिवसेना एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभी  

अकोले – अकोले तालुक्‍यात सध्या शिवसेना प्रवेशाचे वारे जोरदार घोंघावते आहे ? या शिवसेना प्रवेशाच्या वाऱ्याची तालुक्‍यामध्ये जोरदार व खमंग चर्चा सुरू आहे. विशेष बाब म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांनी हातामध्ये थाळी घेऊन या प्रवेशाची घंटा दाही दिशांना वाजवायला सुरुवात केली आहे.

सध्या शिवसेनेमध्ये दोन गट आहेत. विद्यमान तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ व त्यांच्या विरोधात असणारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे यांचा. या दोन गटांमध्ये एक समान सूत्र आहे. शिवसेना पक्षाचा विकास झाला पाहिजे. या विकासाच्या नावाखाली दुसऱ्याचेही हितसंबंध वाढता कामा नये.आपल्यापेक्षा दुसरा गट प्रबळ होता कामा नये, याचीही काळजी विशेषकरून हे दोन्ही गट घेत एकमेकांच्या विरोधात पंगा घेत आहेत.

शिवसेना बचाव, आमदार दराडे हटाव अशा प्रकारचे वारे अलीकडेच वादळ म्हणून आले. ते वादळ आता बऱ्यापैकी शांत होऊ लागले आहे. दुसरीकडे भाजप हा विधानसभा मतदारसंघ आपल्या हाती खेचण्यासाठी व्यूव्हनीती रचत आहे. त्यासाठी खासदार सरोज पांडे यांच्या उपस्थितीत नगर येथे जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, त्याचबरोबर भाजप तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी जोरदार चर्चा घडवून आणली. शिवसेना गेली 35 वर्षे निवडणूक लढवून अपयशी ठरत आहे. तेव्हा अकोले विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळाला, तर ही जागा येन केन प्रकारे आम्ही जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे.

एकीकडे घरात धूर झाला आहे (गट बाजी), तर बाहेर वणवा पेटण्याची दाहक परिस्थिती निर्माण होत आहे (मतदार संघ बदल). त्यामुळे शिवसेना दुहेरी कात्रीत सापडली आहे. त्यात शिवसेना प्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे “घरचं पडलं थोडं, व्याह्याने धाडलं घोडं’ अशी शिवसेनेची गोची झाली आहे. यामुळे हे घरचे भांडण आहे ते बाजूला राहिले. आणि सध्या ‘मतलई वारे’ पावसाचे ढग न आणता “प्रवेशाचे’ वारे पसरवून राजकीय वातावरण शंकेचे, कुटाळखोरीचे, संशयाचे बनवीत आहे. “प्रवेशा’चे वारे घोंघावत आहे? याचीही खमंग चर्चा सध्या तालुक्‍यात सुरू आहे.
पक्षनिष्ठेच्या नावाखाली या प्रवेशाला थोडासा अंकुश ठेवण्याचे काम एकीकडे सुरू आहे.

दुसरीकडे आपला मित्र परिवार, आपले सहकारी धनुष्यबाण हाती घेऊन शिवधनुष्य पेलण्याची, शिवबंधन मनगटावर बांधण्याची ही खेळी रचत आहेत. त्यामुळे विद्यमान परिस्थिती मात्र शिवसेनेच्या प्रवेशाची रंगू लागल्याची वार्ता अनेकाना सुखद, तर काहींना अस्वस्थ करणारी आहे. यामुळे कोण कोणाच्या विरोधात ? अशी या ठिकाणची चर्चा आहे. अशा पार्श्वभूमीवर मात्र कुणीही, काहीही शंका घेतली. मात्र सध्या तरी शिवसेना प्रवेशाच्या वाऱ्याला कोणीतरी भडकावण्याचे काम करीत आहे. “थोरली पाती,’ “धाकटी पाती,’ “मातोश्री,’ “प्रवेशसोहळा,’ “साहेब,’ “आमचे-तुमचे’ हे शब्द आज मोबाईल अथवा दूरध्वनीवरून संभाषणाला महत्वाचे स्थान निर्माण व ओळख निर्माण करताहेत.

अकोले तालुक्‍यामध्ये शिवसेना प्रवेशाची जी वाऱ्याची “दिशा’ आहे किंवा “नीती’ आहे ती मात्र अजून “बे’भरवशाची अगर “अ’विश्वासाची आणि कोणत्याही प्रकारे हा वारा थोपवून देण्याची आहे. त्यामुळे हे “वारे’ नेमके कोणाला आपल्याबरोबर, वादात अडकवून ठेवणार किंवा मध्येच वारे बसून घेऊन कोणाला तोंडघशी पाडणार? हे मात्र आज भाकीत करणे कठीण बनले आहे.
अकोले तालुक्‍याचे राजकारण सध्या भाजप-शिवसेना एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभी आहे. नाही म्हणायला रिपब्लिकन पक्ष आणि शेतकरी संघटना यांचे पारडे ज्या बाजूने झुकेल, त्या बाजूने विजयाची पताका फडकेल, अशा प्रकारचे चित्र आहे. आज विजयाचा झेंडा कोण उभारणार ? यापेक्षा प्रवेशाच्या झेंड्याची मात्र जोरदार चर्चा आहे, एवढे मात्र नक्की.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)