ताजणे यांना शिवनेर भूषण, डुंबरे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार
जुन्नर -किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता तेवीस कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन आवारात आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमांत ते बोलत होते. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजिनक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चौहान, बॅंकेचे संचालक तथा कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, महिला राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा उज्वला शेवाळे, यांसह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, शिक्षण यांची माहिती सर्वांना होण्यासाठी ‘जिजाऊमाता ते शिवरायांच्या रोहिडेश्वरावरील स्वराज्याची शपथ’ या घटनाक्रमांवर आधारित शिवसंस्कार सृष्टी उभारण्यात येईल. तसेच वयस्कांच्या सोयीसाठी रोपवे उभारण्याकरिता सर्वेक्षणासाठी निधी दिला जाईल.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार अतुल बेनके यांची भाषणे झाली. या कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते माजी सहायक पोलीस आयुक्त वसंत ताजणे यांना शिवनेर भूषण पुरस्कार, तर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अपर पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे, विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे, विकास अधिकारी संजीव गोसावी, बॅंकेच्या तालुक्यातील वीस शाखांतील प्रतिनिधी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्थसंकल्पात शेतकरी, विद्यार्थी केंद्रस्थानी
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, जिल्ह्याचा 650 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा तयार केला आहे. राज्याच्या आगामी अर्थ संकल्पात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे. शालेय शिक्षण, अंगणवाड्या, आरोग्य अशा अत्यावश्यक कामांसाठी दीड ते दोन टक्के व्याज दर आकारणाऱ्या जागतिक स्तरावरील वित्तीय संस्थाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
बॅंकेची जबाबदारी काळेंकडे द्यावी
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या जुन्नर तालुक्यातील शाखांचे काम आदर्शवत असून काटेकोर पद्धतीने कामकाज करणाऱ्या ऍड. संजय काळे यांच्याकडे संपूर्ण बॅंकेची जबाबदारी द्यावी, असे मत जिल्हा बॅंकेच्या जुन्नर येथील नूतन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी पवार यांनी व्यक्त केले.