शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

पुणे – सामान्य रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषीत, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्र पुढे जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

किल्ले शिवनेरी ता. जुन्नर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्त आयोजित अभिवादन सभेत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अभिवादन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र कुंजीर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या काळात भारतातील अनेक राजे गुलामगिरी पत्करून होते, त्या काळात मॉ जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. समाजातील आठरापगड जाती-धर्मातील मावळ्यांना एकत्र करून रयतेच्या स्वराज्याची निर्मिती महाराजांनी केली.

छत्रपतींच्या प्रेरणेनेच शासनाने विविध प्रश्न मार्गी लावल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, ‘मराठा आरक्षणासह विविध प्रश्न शासनाने सोडविले आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील ८० टक्के गुन्हे मागे घेतल्या असून उर्वरीत केसेस मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रीया सुरू आहे’.

छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वात महान राजांपैकी एक होते. त्यांची प्रत्येक गोष्ट पथदर्शी असून त्यांचे स्मारकही त्यांच्या कार्याएवढेच भव्य दिव्य स्वरूपात अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे. महाराजांच्या स्मारकाला प्रत्येक सामान्य माणूस भेट देवू शकेल अशी व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

शासनाच्यावतीने खासदार छत्रपती संभाजीमहाराज यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनाचे चांगले काम सुरू आहे. आतापर्यंत या कामासाठी शासनाच्यावतीने ६०६ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असल्याचे सांगत त्याच धर्तीवर राज्यातील इतर महत्वाच्या गडकोटांच्या संवर्धनाचे काम सूरू असून शासन याकामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच शिवनेरीच्या पर्यटन विकासाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सुरुवातीला शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्माच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी पारंपारिक वेशातील महिलांनी शिवछत्रपतींची महिती सांगणारा पाळणा म्हटला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची पालखी आपल्या खांद्यावर घेत काही अंतर पार केले.

यावेळी आदिवासी महादेव कोळी समाजाच्या श्री तळेश्वर लेझिम पथकाच्यावतीने पारंपारिक लेझिम खेळाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. पोलीस बँड पथकाच्यावतीने राष्ट्रगीत सादर केले. पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने शिवनेरी किल्ल्यावर आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.