एसटी बसेसना इतर लेनमधून धावण्याची मुभा देण्याची मागणी
पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील लेन नंबर तीनमधून एसटी महामंडळाच्या गाड्या धावतात. मात्र, या लेनमधून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने महामंडळाच्या गाड्यांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, मालवाहतूक वाहनांना ओव्हरटेक करताना या मार्गावर एसटी महामंडळाच्या शिवनेरी व शिवशाही बसला “लेन कटींग’चा ऑनलाइन दंड बसत आहे. त्यामुळे, संबंधित विभागाने एसटी महामंडळाला द्रुतगती मार्गावर नियमाप्रमाणे इतर लेनमधून धावण्याची मुभा द्यावी, अशी मागणी एसटी महामंडळाने केली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर), पुणे स्टेशन, वल्लभनगर या आगारातून मुंबईला जाण्यासाठी शिवनेरी व शिवशाही बसचे संचलन होते. या बस मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने धावत असताना मुंबई अथवा पुण्यात नियोजित वेळेत पोहोचणे आवश्यक असते. मात्र, या मार्गावरील लेन तीनमधून एसटी व मालवाहतूक गाड्यांना परवानगी आहे. या वाहनांनी इतर लेनमध्ये प्रवेश केल्यास संबंधित वाहनांवर ऑनलाइन दंड होत आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या मार्गावर मालवाहतूक वाहनांची गती कमी असल्याने शिवनेरी व शिवशाही वाहनांना ओव्हरटेक करणे क्रमप्राप्त आहे.
अवजड वाहनांच्या पाठीमागून बसचे संचलन झाल्यास मुंबई-पुणे अथवा पुणे-मुंबई संचलनाची व्यवस्था कोलमडत आहे. त्यामुळे, संबंधित विभागाने महामंडळाच्या वाहनांना इतर लेनमधून जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एसटी महामंडळाच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी केली आहे.
गतीची मर्यादा कमी-जास्त असल्याने खोळंबा
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मालवाहतूक वाहनांना गतीची मर्यादा 65 ठेवण्यात आली आहे. तर, एसटी वाहनांना 80 ठेवली आहे. मालवाहतूक वाहनांची गती कमी तर एसटी वाहनांची गती जास्त आहे. या दोन्ही वाहनांची वेगे मर्यादा वेगळी असल्याने खोळंबा होत आहे.