Shivneri Hapus Mango – ढगाळ हवामान, वाढलेली आर्द्रता आणि अवकाळी पावसाची शक्यता यामुळे जुन्नर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. एकीकडे बुरशीजन्य व कीडजन्य रोगांचा धोका वाढत असताना, दुसरीकडे त्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कराव्या लागणार्या सततच्या फवारण्यांमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील नामांकित ‘शिवनेरी हापूस’ आंब्याच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मीना व कुकडी नदीच्या खोर्यातील काले, येणेरे, काटेडे, वडज, पारुंडे, चिंचोली, कुसूर, तांबे, बोतार्डे, शिंदे, राळेगण आदी भागांत मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याची लागवड केली जाते. ‘आंब्याचे आगर’ म्हणून ओळखल्या जाणार्या या परिसरातील हापूस आंब्याला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चव, रंग व सुवासामुळे भौगोलिक संकेत (ॠख) नामांकन मिळाले आहे. मात्र सध्याचे बदलते हवामान या दर्जेदार उत्पादनासाठी चिंतेचे कारण ठरत आहे. सध्या बहुतांश आंबा बागांमध्ये मोहर चांगल्या प्रमाणात आलेला असला, तरी सततचे ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे करपा, भुरी तसेच विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याचा थेट परिणाम मोहराच्या कणीत प्रक्रियेवर होऊन पुढील फळधारणेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव फळगळीस कारणीभूत ठरू शकतो, अशी भीतीही उत्पादक शेतकर्यांतून व्यक्त केली जात आहे. कुमशेत : येथे आंब्याच्या झाडाला आलेला मोहर. फवारण्यांचीं संख्या वाढली या संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी अनेक शेतकर्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारण्यांची संख्या वाढवली आहे. मात्र एका एकर क्षेत्रासाठी सहा ते सात हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हवामान अनुकूल ठरले नाही, तर हा खर्च वाया जाण्याची भीतीही शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. कृषी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन आवश्यक हवामानातील ही अनिश्चितता केवळ उत्पादन घटण्यापुरती मर्यादित न राहता शिवनेरी च्या दर्जावरही परिणाम करू शकते. त्यामुळे आगामी काळात हवामानातील प्रत्येक बदल आंबा उत्पादकांसाठी निर्णायक ठरणार आहे. शासनाने तातडीने कृषी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, तांत्रिक मदत तसेच संभाव्य नुकसान भरपाईबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकर्यांकडून जोर धरत आहे.