नगरसेवकही भाजपवासी; राजेंना अपेक्षित कामांसाठी योग्य पाठिंबा देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
सातारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे गरवारे क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. शिवेंद्रसिंहराजेंसह (बाबाराजे) नगर विकास आघाडीचे सर्व सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारीसुद्धा भाजपवासी झाले. “बाबाराजे, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशा घोषणांनी गरवारे क्लबचे दालन दणाणले. देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रसिंहराजे यांचे भाजपचा मफलर घालून त्यांचे जोरदार स्वागत केले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, धनंजय जांभळे, ऍड. प्रशांत खामकर, विठ्ठल बलशेटवार यावेळी उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत नगरविकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने, पक्षप्रतोद अमोल मोहिते, अविनाश कदम, राजू भोसले, फिरोज पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रम पवार व सर्व संचालकांनीसुध्दा भाजपमध्ये प्रवेश केला. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रवेशाची भाजपकडून विशेषत्वाने दखल घेण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा आपल्या पक्षात प्रवेश झाला आहे.
सातारा जिल्हयात पक्ष बळकटीकरणासाठी आश्वासक चेहरा मिळाला असून पुढील काळात राजेंना अपेक्षित असणाऱ्या कामासाठी योग्य तो पाठिंबा देण्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “एकच राजे शिवेंद्रराजे’ या घोषणांच्या दणक्याने सारे वातावरण ढवळून निघाले. भाजप जिल्हा कार्यकारिणीनेसुध्दा शिवेंद्रसिंहराजे यांना आगामी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सहकारी भारतीचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजे यांचे अभिनंदन केले. जिल्हयात भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गती देण्यासाठी सर्वव्यापी तातडीची बैठक बोलावण्यात येईल, अशी ग्वाही बाबाराजेंनी दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी थेट मुंबईवरून दिली.
मुंबईतून थेट अजिंक्यतारा कारखान्यावर
भाजप प्रवेश झाल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे सायंकाळी साडेसहा वाजता अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर दाखल झाले. तेथे कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले. तुमच्याच पाठिंब्यावर आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मी पक्षांतर केले आहे, तुम्ही सोबत आहात काय, असे बाबाराजेंनी विचारताच समर्थकांनी हात उंचावून आपला पाठिंबा व्यक्त केला. या अभिनंदन सोहळ्यात भाजपचे मूळ सदस्य मात्र दिसले नाहीत. बाबाराजेंच्या राजकीय आखाडीचा रंग मात्र वेगळाच होता.
शिवेंद्रराजे भाजपात, मकरंद पाटील बॅंकेत
शिवेंद्रसिंहराजे यांचा भाजपप्रवेश राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्या मनाला भलताच डाचला आहे. राष्ट्रवादीची पडझड रोखण्यासाठी पवार स्वतः गुरुवारी साताऱ्यात आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या सूत्रांचा दुजोरा मिळाला नाही. दरम्यान राष्ट्रवादीतही बुधवारी वेगवान घडामोडी झाल्या. शिवेंद्रराजेच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादीने तातडीने सातारा जिल्हा बॅंकेच्या रिक्त संचालकपदी मकरंद पाटील यांची बिनविरोध निवड केली. लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनाने हे संचालकपद रिक्त झाले होते.