मकरंद पाटील यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती
सातारा: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालकपदी मकरंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रवादीची सत्ता असलेली व देशात नावलौकिक प्राप्त केलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ निर्माण झाली असून पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी सतर्क झाले आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणून स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव मकरंद पाटील यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.