सातारा – सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवण्यास मी इच्छुक होतो. कार्यकर्त्यांचाही तसा आग्रह होता; परंतु माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवेंद्रराजेंची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांचेच काम करणार आहे, असे निश्चय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती अमित कदम यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात अमित कदम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. जिल्हा परिषद निवडणुकीपासून मी मतदारसंघात भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, पक्षाने शिवेंद्रराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे पक्षाचे सक्षम उमेदवार म्हणून शिवेंद्रराजे यांचे काम करण्याचा पक्षादेश मानण्याचे ठरवले आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचे विभागवार मेळावे घेणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ, सातारा-जावळी व वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याचा निश्चय केला आहे.