सातारा जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे शिवेंद्रराजेंच्या हाती देणार

सातारा – भाजप पश्‍चिम महाराष्ट्रात तरुण पिढी सक्षम करून त्यांचे नेतृत्व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सोपवणार आहे. बाबाराजेंच्या सातारा-जावळी मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव निधी देण्यात येईल. गेल्या पाच वर्षात राज्यात भाजपमुळे असंख्य विकासकामे झाली आहेत. त्यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार येणार, हे स्पष्ट आहे. या सभेला शिवेंद्रराजेंच्या प्रेमापोटी विराट जनुसमुदाय उपस्थित राहिला. पुढील सरकारमध्ये सातारा जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे शिवेंद्रराजेंच्या हाती देणार, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे सातारा-जावळी मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कुडाळ, ता. जावळी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी आमदार सदाशिव सपकाळ, अमित कदम, बुवासाहेब पिसाळ, पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे, एकनाथ ओंबळे, एकनाथ रोकडे, ज्ञानदेव रांजणे, योगेश गोळे, रवी परामणे, धनंजय जांभळे, सुशील मोझर, वीरेंद्र शिंदे, दत्ताजी थोरात, विजय काटवटे, पांडुरंग जवळ, विजय मोकाशी, मोहन कासुर्डे, विश्‍वनाथ धनवडे, मच्छिंद्र सकटे, सागर भिसे, सौ. कांचन साळुंखे, सचिन जवळ, नितीन पार्टे, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आहे. सरकारने वर्षाला 3200 कोटींचा पीक विमा दिला आहे. जलयुक्त शिवार योजनेत वर्षाला एक लाख 72 हजार शेततळे बांधली. उसाला एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. भाजपची सत्ता पुन्हा येणार, हे माहीत असतानादेखील शरद पवार झोपेचे सोंग घेत आहेत. येत्या काळात पश्‍चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीमुक्‍त होईल.

शिवेंद्रराजे म्हणाले, दादांची साथ व मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास आमच्या पाठीशी असल्याने येथील विकासकामे येत्या काळात पूर्ण करणार आहे. बोंडारवाडी, महू-हातगेघर धरण, हुमगाव-बावधन रस्ता मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे. प्रतापगड साखर कारखाना पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे. भाजपच्या माध्यमातून जावळी तालुक्‍याला नवीन चेहरा देणार आहे. सध्याचा राष्ट्रवादीचा उमेदवार संधिसाधू असून स्वार्थी राजकारण करत आहे. त्यांचा पराजय निश्‍चित असून पुढच्या कालावधीत भाजपकडे वळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला थारा देऊ नये.

आता कोणी काहीही बोलू दे, या निवडणुकीत माझा आणि उदयनराजेंचा विजय निश्‍चित आहे.
सपकाळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी या विकासपुरुषाची न भूतो न भविष्यती अशी सभा झाल्याने जिल्ह्यातील लोकांमध्ये उत्साह संचारला आहे. लोकांची साथ पाहता शिवेंद्रराजेंना राज्यात सर्वाधिक मताधिक्‍य मिळणार असून ते पालकमंत्री म्हणून आपल्याला लाभणार आहेत. अमित कदम, एकनाथ रोकडे, एकनाथ ओंबळे यांनी मनोगत व्यक्त केले. ऍड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रसेन शिंदे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.