ठेकेदार कंपनीने मागितली 15 जानेवारीपर्यंत मुदत
सातारा – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा-पुणे टप्प्यातील रस्त्याची दुरुस्ती न केल्याने आक्रमक झालेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व कार्यकर्त्यांनी बुधवारी दोन ते सव्वादोन तास आनेवाडी टोल नाका बंद पाडून निदर्शने केली. त्यांच्या ठिय्या आंदोलनामुळे टोलवसुली बंद होऊन ठेकेदार कंपनीला फटका बसला. अखेर रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आ. शिवेंद्रराजेंची भेट घेऊन महामार्गाची दुरुस्ती व सोयीसुविधा पुरवण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत मागून घेतली.
सातारा-पुणे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. वाहने खड्ड्यांमध्ये आदळत असल्याने अनेकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. त्यामुळे “टोलविरोधी सातारी जनता’ असा समूह स्थापन करून ऑनलाइन पीटिशन सुरू करण्यात आली होती. त्यानंतर साताऱ्यातील लोकप्रतिनिधींना जाग आली.
त्यातून माजी खासदार उदयनराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला “अल्टिमेटम’ दिला होता. आ. शिवेंद्रराजे यांनी विविध स्तरावर पत्रव्यवहार आणि भेटी घेऊन शासनाकडे दाद मागितली होती. गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुदत मागून घेतली होती. निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्यात त्यांना अपयश आल्याने आ. शिवेंद्रराजे व समर्थकांनी आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन केले.
आज दुपारी 12 च्या सुमारास आंदोलन सुरू झाले. आ. शिवेंद्रराजे व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे टोलवसुली सव्वादोन तास बंद करण्यात आली. शिवेंद्रराजे आपल्या समर्थकांसह घोषणाबाजी करत टोल नाक्यावर पुणे लेनवरून चालत आले, तेव्हा पोलीस टोलच्या बूम बॅरियरजवळ सज्ज होते.
आ. शिवेंद्रराजे व समर्थकांनी रिलायन्स इन्फ्राच्या निषेधाच्या घोषणा देत फलक झळकावले. “रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, “सुविधा द्या अन्यथा टोल बंद करा’, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. टोलवसुली बंद करण्यासाठी त्यांनी तेथे ठिय्या मारल्या. दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत आंदोलन सुरू राहिल्याने दोन्ही बाजूची वाहने टोल न भरताच जात होती.
अखेर रिलायन्सचे संचालक आर. एन. सिंग आंदोलनस्थळी आले. त्यांनी आ. शिवेंद्रराजेंबरोबर चर्चा केली. टोल नाक्याच्या वीस किमी परिघातील गावांमधील वाहनांना टोलमधून सवलत द्यावी, महामार्गाच्या दुरुस्ती व कराराप्रमाणे सोयीसुविधा पुरविण्याची आग्रही मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली. सिंग यांनी या कामांसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत मागितली. त्यांचे म्हणणे मान्य करून आ. शिवेंद्रराजे यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात सातारा पंचायत समिती सभापती मिलिंद कदम, नगरसेवक धनंजय जांभळे, अमोल मोहिते, अविनाश कदम, कांचन साळुंखे, फिरोज पठाण, राजू भोसले, जयेंद्र चव्हाण, रवींद्र पवार आदी सहभागी झाले होते.
मुजोरी खपवून घेणार नाही
रिलायन्सची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी हा प्रश्न हाती घेतला आहे. रिलायन्स इन्फ्राचे अधिकारी मुजोर असून त्यांना सातारकरांशी देणेघेणे नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
खेड शिवापूर टोल नाक्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर कदम यांनी घेतलेली ठोस भूमिका आनेवाडी टोल नाक्यासंदर्भात श्वेता सिंघल यांनी घ्यावी. रिलायन्सला मी इशारा दिला नव्हता. त्यांनी 15 दिवसांची मुदत मागून घेतली होती. त्यानंतर महिनाभरात काहीच हालचाली झाल्या नाहीत. पोटावर मारल्यावरच डोक्यात प्रकाश पडतो. महसुलात घट झाल्यावरच ठेकेदाराला समज येईल. उपाययोजना न झाल्यास यापुढे खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात येईल.