जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतला पवित्रा, गोडोली तळे सुशोभीकरणासाठी दोन कोटींची तरतूद
सातारा – जिल्हा नियोजन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावळी मतदारसंघातील विविध समस्या आक्रमकपणे मांडून त्यासाठी निधी मिळण्याची मागणी केली. कास, बामणोली रस्ता बंद असून अनेक ठिकाणी रस्ता खचण्याचे प्रकार घडत आहेत.
याकडे सातारा नगरपालिका प्रशासन आणि जलंपदा विभाग दुर्लक्ष करत असल्याचे सांगून तातडीने रस्ता पूर्ववत करण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
विविध प्रश्नांवर चर्चा करतानाच गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणासाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे दोन कोटी निधीची तरतूद करण्यात आली. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.
करहर आणि कसुंबी तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा मिळाला. मात्र या तीर्थक्षेत्रांचा अधिक गतीने विकास होण्यासाठी या दोन्ही तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. कास येथील घाटाई देवी तीर्थक्षेत्राला क वर्ग दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठवून हाही प्रश्न सोडवावा, अशी मागणीही त्यांनी केली.जावळी तालुक्यातील मार्ली व आसपासच्या गावातील लोकांच्या सोयीसाठी मार्ली येथे आरोग्य उपकेंद्र सुरु करणे आवश्यक असून हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे दाखल आहे. हा प्रस्ताव मंजूर करुन मार्ली आरोग्य उपकेंद्रास मंजुरी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. सांगवी गाव चार दिवस अंधारात असताना येथील ग्रामस्थ वीज वितरण कंपनीच्या मेढ्यातील कार्यालयात गेले तर, तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उर्मट उत्तरे दिली. याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत संताप व्यक्त केला. त्वरीत वीज सुरु करण्याच्या सूचना केल्या.
कास रस्ता, कास धरणाचे काम सुरु असून नगरपालिका व जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळे सातारा ते कास- बामणोली जाणारा रस्ता बंद आहे. त्यामुळे कास, बामणोली व या परिसरातील अन्य गावातील लोकांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. नगरपालिका प्रशासन आणि जलंसंपदा विभागाकडून रस्तादुरूस्तीसाठी विलंब होत आहे. ही बाब गंभीर असून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी. तसेच या रस्त्यासह ठोसेघरला जाणाऱ्या खचलेल्या रस्त्याबाबतही तातडीने उपाययोजना करुन लोकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत केली.