साताराः अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यांनी केलेल्या विधानावरून अनेकठिकाणी निषेध देखील नोंदविण्यात आला. राजकीय वर्तुळातून देखील सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानावर टीका करण्यात आली. यानंतर राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाबाबत दिलीगिरी देखील व्यक्त केली होती. मात्र, भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी राहुल सोलापूरकर हे महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहेत, त्यांना माफी नाहीच, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशी बेताल वक्तव्य करणार्यांवर सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी केली आहे.आपलं भवितव्य विझायला लागलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वक्तव्य करणं ही फॅशन झाली आहे. राहुल सोलापूरकर हे महाराष्ट्र पेटवण्याचं उद्योग करत असल्याची टीका त्यांनी सोलापूरकर यांच्यावर केली आहे. प्रकाशझोतात येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केलं की आपली चर्चा होते, असे देखील शिवेंद्रराजे यावेळी बोलताना म्हणाले.
सोलापूरकर यांनी व्यक्ती केली दिलगिरी
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका यूट्यूब चॅनेलच्या पॅाडकास्टच्या मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्यावरून लाच देऊन सुटका करून घेतल्याचे वादग्रस्त विधान सोलापूरकर यांनी केले होते. यावर स्पष्टीकरण देताना सोलापूरकर यांनी महाराजांनी औरंगजेबाच्या इतर लोकांना कशा पद्धतीने आपल्या बाजूने वळवून घेतले आणि कशी स्वत:ची सुटका करून घेतली, हे मी सांगताना लाच हा शब्द वापरला. साम-दाम-दंड-भेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची स्वत:ची सुटका करून घेतली हे मला सांगायचं होत, असे सोलापूरकर यांनी सांगितले.