शिवभोजन योजनेत नगरची राज्यात आघाडी

जिल्हाधिकारी द्विवेदींनी दिली 5 केंद्रांना मंजुरी :26 जानेवारीस पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन
नगर  –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गरजवंतांना सवलतीच्या दरात शिवभोजन योजनेची घोषणा केली. यासंदर्भातील अन्न व नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय 1 जानेवारी रोजी जारी करण्यात आला. दरम्यान नगर शहरात पाच ठिकाणी शिवभोजन केंद्रांना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी मंजुरी दिली आहे. शिवभोजन योजनेत जिल्हा प्रशासनाने राज्यात आघाडी घेतली असून येत्या 26 जानेवारीला ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शिवभोजन केंद्रांचे विधिवत उद्‌घाटन होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाममात्र दरामध्ये राज्यातील गरजू व्यक्तींना भोजन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तारूढ झाले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात दिलेल्या ग्वाहीनुसार शिवभोजन योजनेची घोषणा केली. या योजनेसंदर्भात नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी 1 जानेवारी रोजी राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णय काडून, राज्यात पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शिव भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर योजनेस मिळणारा प्रतिसाद पाहून या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे.

शिवभोजनासाठी लाभार्थी व्यक्तीकडून दहा रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम अनुदानाच्या रूपात संबंधित चालकांना दिली जाणार आहे. यासाठीचा निधी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत संबंधित शिवभोजन योजनेच्या चालकांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यासाठी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत.

पाच शिवभोजन केंद्र
हमाल पंचायत कष्टाची भाकर केंद्र (माळीवाडा बसस्थानक), हॉटेल सुवर्णम प्राईड संचलित अन्नछत्र (तारकपूर बसस्थानका समोर), दत्त हॉटेल (रेल्वे स्टेशन समोर), कृष्णा भोजनालय (जिल्हा रुग्णालया जवळ, तारकपूर रोड), हॉटेल आवळा पेलेस (मार्केट यार्ड प्रवेशद्वार) या पाच ठिकाणी शिवभोजन केंद्र चालू होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.