मुंबई – कविराज भूषण यांनी रचलेली अप्रतिम रचना “इंद्रजिमी जृंभ पर’ ही काव्यरचना कानावर पडताच अंगाअंगात स्फुर्ति संचारते. “इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है।तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है।’ या अजरामर स्तुतीकाव्याचा इथं उल्लेख करण्यामागं एक विशेष कारण आहे. या काव्यातील “शेर शिवराज’ हे ध्रुवपद आता एका मोठ्या मराठी सिनेमाचं शीर्षक बनलं आहे.
फर्जंद, फत्तेशिकस्त आणि नुकताच प्रदर्शित झालेला पावनखिंड’च्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता आपला आगामी ‘शेर शिवराज’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. तर, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि एक दमदार टिझर रिलीज करण्यात आला आहे. आज शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर “शेर शिवराज’ या आगामी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या संदर्भातील एक पोस्ट दिग्पाल लांजेकर यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दिग्पाल यांनी शेअर केल्या पोस्ट मध्ये… “अन्याय निवारण्यासाठी कणाकणांतून बाहेर पडणार, सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह… कधी?…… शेर शिवराज. तिथी (दिनांक) कळणार उद्या! हर हर महादेव”, असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त याच चित्रपटाची चर्चा होताना दिसून येत आहे.
शिवकालीन इतिहासातील अफझलखान वध ही घटना युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच अफझलखानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता, तर शिवाजी महाराजांनी त्यात उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबावतंत्राचा अंतर्भाव केला होता. याच युद्धनीतीवर “शेर शिवराज” हा चित्रपट आधारित आहे.