टाकवे बुद्रुक – आंदर मावळातील कुसूर पठार येथे प्राचीन कुसूर हा घाटमार्ग असून येथे मावळ ऍडव्हेन्चर संस्थेच्या वतीने या घाट मार्गाला प्रसिद्धी मिळावी आणि तो शिवभक्त, गडप्रेमी आणि इतिहास अभ्यासक यांच्या निदर्शनास यावा यासाठी कुसुर घाट पदभ्रमण-कुसूर “हेरिटेज वॉक’ रविवारी (दि. 3) झाला. या वेळी इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांनी घाट मार्गाविषयी उपस्थितांना माहिती दिली.
कुसूर घाट “हेरिटेज वॉक’चे रविवारी सकाळी कुसूर गावातून सुरवात झाली. युद्ध मोहिमांची हालचाली, समुद्र मार्ग, मालाची ने-आण, व्यापारी, धर्मप्रसारक आदीसाठी पूर्वी घटमार्गाचा वापर केला जात असे. हे घाटमार्ग आजच्या घडीला दुर्लक्षित झाले असून, त्यांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी मावळ ऍडव्हेन्चर संस्थेच्या वतीने कुसूर घाट “हेरिटेज वॉक’चे आयोजन केले होते. या वेळी असंख्य नागरिकांनी सहभाग घेऊन या घाट मार्गाची पाहणी केली. त्याचा इतिहास जाणून घेतला.
ऐतिहासिक घाट वाटांपैकी आंदर मावळातील कुसूर घाट हा प्रसिद्ध असून, येथे पाण्याचे टाके, अष्टकोनी तलाव, मार्ग दाखवणारे दगड व अन्य अनेक प्राचीन अवशेष आजही शिल्लक आहे. याची माहिती गडप्रेमी व इतिहास अभ्यासक यांना व्हावी यासाठी या “हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्वनाथ जावळीकर यांनी दिली. तसेच इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांनी घाट मार्गाविषयी सखोल माहिती सांगत घाट मार्गांच्या इतिहासाला उजाळा दिला.
या वेळी कुसूरचे सरपंच दत्तात्रय खुल्लम, प्रा. डॉ. राजेंद्र जाधवर, अशोक आडकर, अक्षय अवताडे, चंद्रशेखर खंडभोर, ज्ञानेश्वर तनपुरे आदींनी या “हेरिटेज वॉक’ साठी विशेष प्रयत्न केले.