नवी दिल्ली : भारतीय लष्कर आणि वायूसेनेमध्ये महिला पायलटसनी आपल्या कामाचा ठसा याआधीच उमटवला आहे. मात्र, नेव्ही अर्थात नौसेनेमध्ये आजवर महिला पायलट्सनी प्रवेश केला नव्हता. ती उणीव बिहारच्या मुजफ्फराबादमधल्या अवघ्या 24 वर्षांच्या शिवांगी स्वरुपने भरुन काढली आहे. तिच्या या कामगिरीचं खूप कौतुक होत आहे.
तिच्या या प्रवेशाने नाविक दलात प्रवेश करण्याची आशा देशातील तरुणींमध्ये जागवली जात आहे, हे विशेष. सर्वसामान्य घरातल्या शिवांगीने मारलेली ही मजल अनेकींना प्रेरणा देऊन जाईल. मुजफ्फराबादमधल्या पारो या लहानशा गावची रहिवासी असलेली शिवांगी वर्ष 2010 मध्ये डीएव्ही पब्लिक स्कूलमधून दहावी उत्तीर्ण झाली.
लहानपणी आजोळी गेली असताना तिच्या शेजारच्या घराजवळ एक हेलीकॉप्टर उतरलं होतं. हेलीकॉप्टर चालवणाऱ्या पायलटला बघून शिवांगीचे डोळे विस्फारले होते. या घटनेनंतर ती खूपच भारावून गेली आणि आपणही असंच काहीतरी करावं, असं तिच्या मनात आलं होतं. शिवांगी सीबीएसई बोर्डची विद्यार्थिनी. तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने इंजिनिअर व्हायचं ठरवलं. सिक्किम मणीपाल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून तिनं बी-टेकची पदवी मिळवली. एम-टेक करण्यासाठी ती जयपूरला आली. मालवीय नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तिने प्रवेश घेतला. बी.टेक करत असताना शिवांगीच्या कॉलेजमध्ये नौदल अधिकारी आले होते.
त्यांनी नौदलाबाबत सादरीकरण केलं. हे सादरीकरण बघितल्यानंतर शिवांगी खूपच प्रभावित झाली आणि तिने मनोमन नौदलात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. नौदलाच्या अधिकाऱ्याचं सादरीकरण बघितल्यानंतर शिवांगीने सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज केला. शिवांगी ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पण जागा कमी असल्याने तिला बोलावणं आलं नाही. एम-टेक करत असताना या परीक्षेसाठी तिने पुन्हा अर्ज केला.
तिने बंगळूरूमध्ये ही परीक्षा झाली आणि यावेळी तिला संधी मिळाली. प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवांगी 2018 मध्ये भारतीय नौदलात रूजू झाली. व्हाईस ऍडमिरल ए. के. चावला यांनी तिला नौदलात दाखल करून घेतलं होतं. शिवांगी नौदलात सब लेफ्टनंट पदावर होती.
आता ती कोची इथे कामावर रूजू होईल. ती फिक्स्ड विंग डोर्नियर सर्व्हिलान्स विमान उडवेल. ही विमानं कमी अंतराच्या सागरी मोहिमांवर धाडली जातात. यात ऍडव्हान्स सर्व्हिलन्स, रडार, नेटवर्किंग आणि इलेक्ट्रॉनिक सेंसर्स लावले असतात.