नेवासा : श्रावण मासाच्या निमित्ताने नेवासा येथील जय भोलेनाथ ग्रुपच्या महिला भगिनींनी एकत्रित येऊन प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या श्री काशीविश्वेश्वर मंदिर प्रांगणात शिवलिलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे पारायण हा धार्मिक उपक्रम सुरू केला असून या पारायणाला नेवासा शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिवलीलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे पारायण केल्याने एक रुद्र अभिषेक करण्याचे पुण्य मिळत असल्याने सर्व महिलांनी एकत्रित येत अकराव्या अध्यायाचे पारायण दररोज सायंकाळी ५ ते ६ यावेळेत नित्यनेमाने करत असल्याचे जय भोलेनाथ ग्रुपच्या महिला सदस्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शिवलीलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाच्या पारायणामध्ये नेवासा शहरातील सुमारे चाळीस महिलांचा सहभाग आहे.अगोदर हरे राम,हरे राम चा जप,त्यानंतर शिवलीलामृत अकराव्या अध्यायाचे पारायण,त्यानंतर शिवस्तुती गायली जाते. हनुमान चालिसा,हरिपाठ गाऊन पारायणाची सांगता करण्यात येते.
श्री काशी विश्वेश्वर मंदिर प्रांगणात मुख्य काशीविश्वेश्वर शिवलिंगासह बजरंग बली,श्री शनिदेव,गणपती,नाग देवता दर्शनासाठी स्थापित करण्यात आलेल्या आहेत. त्यातच येथे पेव्हर ब्लॉक टाकल्यामुळे परिसराच्या वैभवात भर पडलेली आहे.विविध प्रकारची झाडे लावून येथील परिसर सुशोभित केल्यामुळे हे क्षेत्र हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.