पुणे – उच्चभ्रू सोसायटी आणि झोपडपट्टी अशा दोन्ही भागांचा जवळपास समप्रमाणात वाटा असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांत यंदा उत्साह दिसून आला. मागील निवडणूकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला आहे. २०१९ मध्ये ४३.८६ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये यंदा (२०२४) मध्ये घसघशीत वाढ होऊन सात टक्के मतदान वाढले आहे.
वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडले आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वाढलेल्या मतदानाचा आम्हालाच फायदा होणार असल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पाहायला मिळाले.
या मतदार संघात शिवाजीनगर गावठाण, मॉडेल कॉलनी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, औंध, बाणेर, खडकी, खडकी बाजार, बोपोडी, दापोडी, पाटील इस्टेट, वाकडेवाडी, पोलीस लाइन, रेंजहिल, गोखलेनगर, वडारवाडी या परिसरांचा समावेश आहे. मतदारसंघात एकूण २८० मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली.
सकाळी मतदार चांगल्या संख्येने उपस्थित होते. उच्चभ्रु मतदार असलेल्या भागात सकाळी तुलनेने जास्त गर्दी होती. मतदार संघात सर्वत्र दुपारपर्यंत हा उत्साह होता. मात्र, त्यानंतर मतदारांची संख्या कमी झाली. दुपारी ३ नंतर मात्र पुन्हा गर्दी झाली. ही गर्दी सायंकाळी सात वाजेपर्यंत कायम होती. विशेषत: वडारवाडी, पाटील इस्टेट, खडकी, बोपोडी भागांतील काही मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली.
अनुचित प्रकार नाही
मतदार यादीत नावे नाहीत. ईव्हीएम बंद पडणे, मतदान केल्यानंतर आवाज न येणे आदी तक्रारी नेहमी येत असतात. मात्र, यंदा शिवाजीनगर भागात उत्तम नियोजन असल्याचे दिसून आले. फारशा तक्रारी नसल्याचे दिसून आले.
वेळ आणि मतदान टक्केवारी
सकाळी ७ ते ९ – ५.२९
सकाळी ९ ते ११ – १३.२१
सकाळी ११ ते दुपारी १ – २३.४६
दुपारी १ ते दुपारी ३ – ३३.८६
दुपारी ३ ते सायंकाळी ५ – ४४.९५
ठळक मुद्दे
– उच्चभ्रू भागात सकाळपासूनच गर्दी होती
– झोपडपट्टी परिसरात चारनंतर गर्दी वाढली
– पोलिसांकडून मोबाइल न वापरण्याच्या सूचना करण्यात येत होत्या
– मतदारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती
– केंद्रात गर्दी असूनही गोंधळ नव्हता
– कोणत्याही अनुचित प्रकाराची तक्रार नाही