बसच्या दररोज होणार सुमारे 500 फेऱ्या
पुणे – मेट्रोच्या कामामुळे एस.टी. बसेसचे शिवाजीनगर स्थानकातून होणारे संपूर्ण संचलन सोमवारपासून वाकडेवाडी स्थानकातून करण्यात येणार आहे. तसेच सर्व बसेसचे वेळापत्रक आधीप्रमाणेच राहणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाकडेवाडी स्थानकाचे काम महामेट्रोकडून करण्यात येत होते. मात्र, स्थानकाच्या अंतर्गत ठिकाणी फलाटाच्या कामांसह अन्य काही कामे रखडल्याने तेथून पूर्ण संचलन सुरू नव्हते. दिवाळीपासून काही बसेस वाकडेवाडीतून सोडण्यास सुरूवात झाली होती. आता चार दिवसांपूर्वी स्थानकाचे काम पूर्ण झाल्याने शिवाजीनगरहून होणारे एस.टी.चे संपूर्ण संचलन वाकडेवाडीतून होणार आहे.
शिवाजीनगर येथून दररोज सुमारे पाचशे एसटी बसेस ये-जा करतात. या सर्व बसेस आजपासून वाकडेवाडी येथून सुटणार आहेत. यामध्ये नाशिकला जाणाऱ्या 42, औरंगाबादला जाणाऱ्या 26 विनावाहक बसेसचा समावेश असून इतर बस विविध ठिकाणी जाणाऱ्या आहेत. मेट्रोच्या भूमिगत स्थानकाच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानक हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पर्यायी जागांची चाचपणी एसटी प्रशासनाने करुन वाकडेवाडीची जागा निश्चित करुन संचलन सुरू होत आहे.