शिवाजीनगर बसस्थानक स्थलांतराचा मार्ग मोकळा

पर्यायी जागेतील झाडांच्या पुनर्रोपणास मान्यता

पुणे – पुणे मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर येथील बसस्थानकाचे स्थलांतर वाकडेवाडी येथील शासकीय दूध योजनेच्या जागेत होणार होते. मात्र, येथे असलेल्या सुमारे अडीचशे झाडांचे पुनर्रोपण करण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता मिळत नसल्याने हे काम रखडले होते. अखेर शुक्रवारी ही परवानगी मिळाल्याने पुनर्रोपण करण्यात येणार असून 1 ऑक्‍टोबरपर्यंत स्थानक स्थलांतरीत होणार असल्याची माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक अतूल गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेट्रोच्या शिवाजीनगर येथील भुयारी स्टेशनसाठी एसटीची जागा घेण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण बसस्थानक वाकडेवाडीच्या दूध योजनेच्या जागेत हलविण्यात येणार आहे. या ठिकाणी महामेट्रोने बसथांबे (शेड्‌स) उभारले असले; तरी कार्यशाळा (वर्कशॉप) बांधण्यासाठी अडीचशे झाडांच्या पुनर्रोपणासाठीची मान्यता महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोर प्रलंबित होती. या झाडांच्या पुनर्रोपणाच्या मान्यतेअभावी मेट्रोला पुढचे काम करता येत नसल्याने बसस्थानकाचे स्थलांतर रखडले होते. आता परवानगी मिळाल्याने 2 महिन्यांत पुनर्रोपणाची प्रक्रिया पूर्ण करून स्थानक या जागेत स्थलांतर होणार आहे. 1 ऑक्‍टोबरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर शिवाजीनगरच्या जागेत भुयारी मेट्रोच्या स्टेशनच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले फळबाजार हलणार
मंडई येथील भुयारी स्टेशनसाठी फळबाजार, पानबाजार आणि झुणका भाकर केंद्र स्थलांतरित करावे लागणार आहे. त्यासाठी मंडईच्या परिसरातील सतिश मिसाळ वाहनतळाची (मिनर्व्हा पार्किंग) तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील जागा निश्‍चित केली आहे. या ठिकाणचा संपूर्ण आराखडा महामेट्रोने महापालिकेला सादर केला असून त्यांच्या मान्यतेनंतर स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान, आराखड्यानंतर आयुक्‍त सौरभ राव यांनीही मागील आठवड्यात या परिसराची पाहणी करून मेट्रोसाठी आवश्‍यक जागा तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.