पुणे – शहराच्या अनेक भागांत कोकणाच्या विविध तालुक्यांमधून आलेल्या लोकांची वस्ती आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत गोखलेनगर, गुंजाळवाडी, जनवाडी या परिसरात सुमारे अडीच हजार कोकणवासीय नागरिक राहतात. या समाजातील अनेक कुटुंबांना नोकरी, व्यवसायासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मदतीचा हात दिला आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील समस्त कोकणवासीय नागरिकांच्या रविवारी (दि. १०) पार पडलेल्या स्नेह मेळाव्यात कोकणवासीय नागरिकांनी गर्दी करून शिरोळे यांनी केलेल्या मदतीविषयीची कृतज्ञता दर्शवली.
बहुतांश कोकणवासीय हॉटेल कामगार आहेत. काही प्रमाणात नोकरी आणि छोट्या- मोठ्या व्यवसायातही त्यांनी जम बसवला आहे. नोकरी, व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी, गरीब घरांतील मुलांच्या शिक्षणासाठी, ज्येष्ठांच्या आजारपणासाठीही शिरोळे यांनी सढळ हस्ते मदत केली आहे.
समस्त कोकणवासीय नागरिकांच्या मेळाव्याला सुमारे एक हजार नागरिक उपस्थित होते. त्यातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मदतीबद्दल कृतज्ञता दर्शवण्यासाठी उपस्थित होता. या वेळी सर्व कोकणवासीय नागरिकांच्या वतीने शिरोळे पाठिंबा जाहीर करण्यात आला.
पूजा जागडे आणि आकाश गजमल यांच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सौरभ कर्डे, ओंकार केदारी, संगीता निकम, खुशी लाटे, रविराज यादव, शुभम हिंगाडे, अमृता म्हेत्रे, ओम हनुमान देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि कोकणवासीय महासंघाचे पदाधिकारी आणि कोकणवासीय नागरिक उपस्थित होते.
कोकणवासीय नागरिक जरी नोकरी, व्यवसायासाठी पुण्यात स्थायिक झाले असले, तरी त्यांची मूळ गावाशी नाळ अजूनही कायम आहे. त्यामुळे मालवण, संगमेश्वर, चिपळूण, कुडाळ, रत्नागिरी आदी गावांतच त्यांची मूळ घरे, देवस्थाने आहेत. तिथे दरवर्षी न चुकता सणावाराला ते जात असतात. त्या मूळ गावांपैकी ओम हनुमान देवस्थान ट्रस्टच्या मंदिरासाठी, संगमेश्वरमधील एका गावकीला स्वयंपाकाच्या भांड्यांसाठीही शिरोळे यांनी व्यक्तिगत निधीतून आर्थिक मदत केल्याबद्दल नागरिकांनी शिरोळे यांचे आभार मानले.