शिवाजी विद्यापीठाच्या स्वयंसेवकांची ‘निर्मल वारी, हरित वारी’

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या कार्यक्षेत्रात आषाढी वारीचे स्वागत करण्याबरोबरच ‘निर्मल वारी, हरित वारी’ अभियान राबविण्याचा निर्धार केला आहे. वारीसमवेत चालताना वारकऱ्यांच्या सेवेबरोबरच हे स्वयंसेवक या अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रमही राबवित आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अर्थात सातारा जिल्ह्यातील निरा येथे आषाढी वारीचे आगमन होताच कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आणि वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत केले. विद्यापीठ कार्यक्षेत्रातूल तिन्ही जिल्ह्यांतून आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुमारे एक हजार स्वयंसेवकांसमवेत कुलगुरू डॉ. शिंदे निरा ते लोणंद या साधारण दहा किलोमीटरच्या दिंडीत सहभागी झाले.

गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्य शासनाने वारीमध्ये ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाला ‘निर्मल वारी, हरित वारी’ या घोषणेची जोड दिली आहे. या घोषणेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि श्री अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आपापल्या कार्यक्षेत्रात करणार आहेत. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी निरा येथे पुणे विद्यापीठाच्या स्वयंसेवकांचेही स्वागत केले.

विद्यापीठाचे स्वयंसेवक आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वच ठिकाणी पालखीच्या मुक्कामी वारकऱ्यांची सेवा करीत असतात. गतवर्षीप्रमाणे यंदाही निर्मल वारी अभियानांतर्गत हे स्वयंसेवक स्वच्छता मोहीम राबविणार आहेतच; पण, त्या जोडीला यंदा वारीच्या मार्गावर ठिकठिकाणी वृक्षारोपण करून ‘हरित वारी’ अभियानही राबविणार आहेत.

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या स्वागतापूर्वी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला. वारकरी संप्रदायाच्या सान्निध्यातून सर्वधर्मसमभावाची प्रचिती आणि व्यक्तीगत आयुष्यात त्याचा अवलंब करण्याची ऊर्मी निश्चितपणे मिळते. त्याचप्रमाणे समाजासाठी निरपेक्ष भावनेतून योगदान देण्याची प्रेरणाही जागृत राहते. त्या दृष्टीने आपल्या या कालावधीतील कामाकडे पाहावे, असे आवाहन कुलगुरूंनी यावेळी केले.

यावेळी त्यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे वीस कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×