Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed । manoj jarange : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर ठिकठिकाणी मोर्चे आणि निषेध आंदोलन करण्यात आले.
विशेष म्हणजे हा पुतळा उभारून फक्त 8 महिने झाले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
या घटनेवरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगले तापले असून, अशात आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात फायबरची मिलावट केली होती, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच राजकोट किल्ल्यावर जात घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मनोज जरांगे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता. त्यात फायबरची मिलावट होती, असं इथल्या काही बांधवांचं म्हणणं आहे.
पश्चिमेकडून वारं येतं होता, मग पुतळा पूर्वेकडे पडायला हवा होता, तो पश्चिमेकडेच कसा काय पडला, या काही शंका आहेत. यात कोणतंही राजकारण होऊ नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
याची सरकारने बारकाईने चौकशी करायला हवी. याप्रकरणी जो कोणी कंत्राटदार असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्ती असतील, त्यांना अजिबात सोडता कामा नये, असे मनोज जरांगे पाटील
ते पुढे म्हणाले, “आरोपीला आयुष्यभर जेलमध्ये ठेवायला हवं. सरकारचा अगदी बारीक लक्ष महापुरुषांचे स्मारक किंवा पुतळे यांच्याबद्दल असायला हवं. फक्त यात कोणतेही राजकारण करु नये. कोणी काहीही शंका उपस्थित केल्या, म्हणून त्या ग्राह्य धरुन नकार देण्याऐवजी यात काय खरं आहे, याचा शोध घ्यायला हवा, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.